लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रोचे खड्डे आणि वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अभिजित शशांक जगदाळे (वय २१) नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गमवावा लागल्याने जगदाळे परिवारावर जबर आघात झाला आहे.मनीषनगरात राहणारा अभिजित रायसोनी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचे वडील शिकवणी वर्ग घेतात. एकुलता एक असल्याने जगदाळे परिवाराचा तो जीव की प्राण होता. नेहमीप्रमाणे अभिजित त्याच्या बजाज डिस्कव्हर दुचाकीने मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता कॉलेजमध्ये जात होता. एमआयडीसी मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन दुचाकी चालकांना प्रवास करावा लागतो. आयसी चौकाजवळून जात असताना अभिजितने एका खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी केला. तेवढ्यात निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या नाना नामक टँकर चालकाने दुचाकीला जोरदार धडक मारली. अभिजित खाली पडला असता आरोपी टँकरचालकाने त्याला चिरडले आणि तसाच वेगात पुढे निघून गेला. गंभीर जखमी झालेल्या अभिजितला उपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अभिजितला मृत घोषित केले. या अपघातात एकुलता एक मुलगा गमावल्याने जगदाळे परिवारावर जबर मानसिक आघात झाला आहे.एमआयडीसी पोलिसांनी विलास नामदेवराव बऱ्हाड (वय ५२) यांच्या तक्रारीवरून आरोपी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून टँकरचा नंबर मिळवल्यानंतर आरोपी टँकरमालक मनोज पटेलच्या घरी गेले. तेव्हा आरोपी टँकरचालक टँकर ठेवून पळून गेल्याचे स्पष्ट झाले. या अपघाताला आरोपी वाहनचालकासोबतच रस्त्यावरील खड्डेही कारणीभूत आहेत.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा भरधाव टँकरने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:30 AM
मेट्रोचे खड्डे आणि वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अभिजित शशांक जगदाळे (वय २१) नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गमवावा लागल्याने जगदाळे परिवारावर जबर आघात झाला आहे.
ठळक मुद्देमेट्रोचा खड्डाही कारणीभूत : आरोपी वाहनचालक फरार