मोरेश्वर मानापुरे, नागपूर : इंजिनिअर्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. आताचे इंजिनिअरिंग लोकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. युवा इंजिनिअर्स कोअर शाखांपासून बाजूला जात आहेत. आता त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. बलाढ्य भारतासाठी इंजिनिअर्सनी आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन इंडियन एअर फोर्स नागपूर हेडक्वार्टर मेंटनन्स कमांडचे एअर मार्शल विजय कुमार गर्ग येथे केले.
५६ वा ‘इंजिनिअर्स डे’ समारंभ इ इन्स्टिट्यून ऑफ इंजिनिअर्सच्या (इंडिया) उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर सेंटरमध्ये बुधवारी पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी व मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) किशोर ठाकरे तर मंचावर नागपूर सेंटरचे अध्यक्ष मिलिंद पाठक आणि सचिव डॉ. जे.एफ. अग्रवाल उपस्थित होते. यावेळी वयाच्या ७५ व्या वर्षी एएमआयई पदवी संपादन करणारे किसन बकाले यांचा सत्कार करण्यात आला. गर्ग म्हणाले, इंजिनिअर्स देशाच्या विकासाचा कणा आहे. त्यांना जनतेनी सहकार्य करावे.
किशोर ठाकरे म्हणाले, देशाच्या संरक्षण खात्यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. विदेशी तंत्रज्ञानाचा कमी अवलंब करतानाचा भारत या उत्पादनात आत्मनिर्भर होत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संस्था देशाच्या विकासात उत्तम कार्य करीत आहेत. नागपूर सेंटरतर्फे निरनिराळे कार्यक्रम राबवून ज्ञानाची देवाणघेवाण करीत आहेत.
मिलिंद पाठक म्हणाले, इंजिनिअर्सनी आत्मनिर्भरतेवर जास्त लक्ष केंद्रीत करावे. त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे. अग्रवाल यांनी हा दिवस सर्वच इंजिनिअर्ससाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संजय तत्त्ववादी यांनी केले तर डॉ. जे.एफ. अग्रवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश रायपुरे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स कोलकाताचे माजी अध्यक्ष हेमंत ठाकरे, पी.के. कुळकर्णी, एस.एस. डोईफोडे, व्ही.के. अळकरी, डॉ. महेश शुक्ला, डॉ. आर.एल. श्रीवास्तव, व्ही.पी. वर्गीस, डॉ. एस.बी. जाजू, डॉ. हेमंत बैतुले, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आणि इंजिनिअर्सचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.