लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत गेल्या काही महिन्यापासून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. या वादाचा फटका कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना बसला आहे. नोकरीवरून कमी केल्याने लॉकडाऊन कालावधीत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.महापालिकेत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यात विविध विभागातील कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामावर याचा परिणाम होऊ नये, यासाठी दीड वर्षापूर्वी ५८ कनिष्ठ अभियंत्यांची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करण्यात आली होती. यात राज्याच्या विविध जिल्ह्यातील अभियंत्यांचा समावेश आहे. १५ ते २५ हजार रुपये वेतन मिळत होते. भविष्यात महापालिकेत कायम केले जाईल या आशेने ते कंत्राटी पध्दतीवर काम करीत होते. वेतन कमी असल्याने काही जण एकाच खोलीत भाड्याने राहात असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.जानेवारी २०१९ मध्ये या कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारीत त्यांचे कंत्राट संपल्याने मनपा प्रशासनाने मुदतवाढ दिली. या बाबतचा प्रस्ताव एप्रिल महिन्यात स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. प्रस्ताव योग्य प्रकारे न पाठविल्याने फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा, अशा अभिप्रायासह हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला. प्रशासनाने स्थायी समितीकडे सुधारित प्रस्ताव न पाठविता या कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस बजावली आहे.मनपा आयुक्त व पदाधिकारी यांच्यात गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू आहे. आयुक्त विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. या वादात कनिष्ठ अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कामावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.संगणक ऑपरेटर चिंतेतकनिष्ठ अभियंता यांना कमी केल्याने मनपात विविध विभागात कार्यरत असलेले २५० कंत्राटी संगणक ऑपरेटर चिंतेत आहेत. कंत्राट न वाढविल्यास त्यांनाही बेरोजगार व्हावे लागणार आहे.
मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या वादात अभियंत्याचा बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:10 PM