लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या बाधेचा फटका इतर क्षेत्राप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रालाही बसला आहे. साहित्याचे, गाण्यांचे, नाटकांचे अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत आणि कलावंत मंडळी घरीच वेळ घालवत आहे. अशा काळात अभिव्यक्तीच्या प्रांतात सतत रममाण असणाऱ्या कलावंत मंडळींतर्फे स्वत:च्या स्तरावर वेगवेगळे सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम राबविले जात आहे. त्याच श्रुंखलेत विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासतर्फे संचालिका डॉ. अरुंधती वैद्य यांनी ‘गंमत मराठी शब्दांची’ हा आगळा वेगळा कार्यक्रम ऑनलाईन सादर केला आहे.या उपक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश विकास सिरपूरकर यांच्यासह शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती सहभागी होत आहेत. मराठी शब्दांची निर्मिती कशी झाली आणि त्यामागील गंमत रसिकांसोबतच शेअर करण्याचा हा उपक्रम रसिकांच्या पसंतीस पडत आहे आणि लॉकडाऊनमुळे मिळालेला बराच मोठा फावला वेळ घालविण्याची संधीही मिळत आहे. ज्याप्रमाणे इंग्रजीतून आलेले गव्हर्नर, मेयर या शब्दांना मराठीत शब्द नव्हता. राज्यपाल, महापौर ही मराठी शब्दे स्वातंत्र्यविर सावरकरांनी दिली. त्याच प्रमाणे गमतीदार उदाहरणेही या मैफिलितून मिळणार आहेत. जसे ओनामा’ हा शब्द. ओनामा या शब्दाचा अर्थ आरंभ किंवा सुरवात असा आहे. पण गंमत म्हणजे या शब्दाचं मूळ जैनांच्या मंत्रात आहे. ‘ॐ नम: सिद्धम’ या मंत्राचे अपभ्रष्ट रूप आहे ‘ओनामासिधं’ पुढे जाऊन त्याचं संक्षिप्त रूप झाले ‘ओनामा’. जो सिद्ध तीर्थंकर महावीर त्याला नमस्कार हा अर्थ कुठल्या कुठे गायब झालाय. त्याच प्रमाणे ‘टशन’ हा शब्द इंग्रजीतला आहे. झाडीपट्टी बोलीभाषेत असाच शब्द ‘ठसन’ म्हणून वापरला जातो आणि टशन व ठसन या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. आता टशनमुळे ठसन निर्माण झाला की ठसन मुळे टशन हा शब्द निर्माण झाला, ही गंमत या मैफिलीत उलगडणार आहे. याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे.
इंग्रजीतले ‘टशन’ तर आमचे ’ठसन’.. ; ऑनलाईन मराठी शब्दमैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:59 AM
विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासतर्फे संचालिका डॉ. अरुंधती वैद्य यांनी ‘गंमत मराठी शब्दांची’ हा आगळा वेगळा कार्यक्रम ऑनलाईन सादर केला आहे.
ठळक मुद्देगंमत मराठी शब्दांची