नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बडकस चौकातील नऊ कोटींच्या जमिनीतून वैमनस्य आल्यामुळे मनीष श्रीवासने प्रतिस्पर्धी गुंडाकडून सुपारी घेतली होती. तो गेम करणार हे जवळपास निश्चित झाल्यामुळेच मनीषचा गेम केला, अशी कबुली गँगस्टर रणजित सफेलकरने दिल्याचे समजते.
हत्या, खंडणी वसुली, जमिनी बळकावणे, सुपारी किलिंग, अपहरण अशा अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेला सफेलकर कधी या तर कधी त्या नेत्याचा आश्रय मिळवून गुंडाराज चालवीत होता. सफेलकरने नंतर स्वत:ला एका सेनेचा अध्यक्ष घोषित केले होते. राजकीय घोंगडे पांघरून आपले पाप झाकत फिरणाऱ्या सफेलकरची गुन्हेगारी सैराट झाली होती. बडकस चौकातील नऊ कोटींच्या जमिनीच्या कब्जा सोडविण्यातून सफेलकरने दीड कोटी लाटले. तेव्हापासून त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना सफेलकर जड झाला. यातून सफेलकरचा काटा काढण्याची सुपारी मनीष श्रीवासने घेतली. मनीष अत्यंत क्रूर आणि धूर्त गुन्हेगार आहे. त्याने सुपारी घेतली तर तो ती फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे माहिती असल्यामुळे सफेलकर हादरला होता. त्यामुळे त्याचाच गेम करण्याची तयारी त्याने केली.
मनीषला कसे उचलायचे, कुठे न्यायचे आणि कसा गेम करायचा, याचा फुल प्रूफ प्लॅन रणजितने बनविला होता. मनीष बाईलवेडा असल्याचे माहीत असल्यामुळे तोच डाव त्याने टाकला. अपहरणाच्या दिवशी आपल्या साथीदारामार्फत मनीषला ‘महिला’ आणल्याचे आमिष दाखवून पवनगावच्या फार्म हाऊसवर नेले आणि तेथे त्याची अत्यंत निर्दयपणे हत्या करून मृतदेहाची खांडोळी करीत विल्हेवाट लावली.
---
‘कानून के हात बहोत लंबे होते है’...
हे फार्म हाऊस पार्टीच्या नावाखाली सफेलकरने घेतले होते. तेथील चाैकीदाराला दोन दिवसांची सुटी देऊन गावाला पाठविले होते. कसलाही पुरावा अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आजूबाजूला राहू नये, याची खास काळजी सफेलकरने घेतली होती. त्याचमुळे या हत्याकांडाला वाचा फुटण्यास विलंब झाला. मात्र, ‘कानून के हात बहोत लंबे होते है’... ही म्हण रास्त ठरवत पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा करीत कुख्यात सफेलकर आणि साथीदारांच्या मुसक्या बांधल्या. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी गजाआड होण्याची शक्यता आहे.
---