विक्रीकर विभागाची योजना : ३० सप्टेंबरनंतर दंडात्मक कारवाई व वसुली नागपूर : महाराष्ट्रात व्यवसाय कायद्यांतर्गत व्यक्तिगत, सोसायट्या, संस्था, कंपन्या यांना व्यवसाय कराची नोंदणी करणे बंधनकारक असून विक्रीकर विभागाची व्यवसाय कर नावनोंदणी अभय योजना ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर नावनोंदणी न केलेल्यांकडून संपूर्ण कराची वसुली आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही योजना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मागील तीन वर्षांचा व चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ या वर्षाचा व्यवसाय कर भरणे अनिवार्य आहे. नावनोंदणी न केलेल्या प्रत्येकाला योजनेंतर्गत तीन वर्षांचा ७५०० रुपये कर भरायचा आहे. न भरल्यास करदात्यांकडून आठ वर्षांची करवसुली आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. व्यक्तिगत कर भरणा करणाऱ्याला व्यावसायिक कर नामांकन प्रमाणपत्र क्रमांक (पीटीईसी) आणि कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक कर कर्मचारी प्रमाणपत्र क्रमांक घ्यावा लागेल. यात आयकर सवलतीची तरतूद आहे. विक्रीकर विभागाचे सहआयुक्त अग्रवाल यांनी सांगितले की, योजनेमुळे शासनाचा महसूल वाढणार असून त्यासाठी मनुष्यबळाची तरतूद केली आहे. योजनेंतर्गत नावनोंदणी करणाऱ्यास १ एप्रिल २०१३ पूर्वीचा व्यवसाय कर व व्याज आणि व्यवसाय कर कायदा कलम ५(५) खाली भरायचा दंडसुद्धा माफ होईल. नागपूर विभागांतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यात नोंदणी सुरू आहे. नागपूर विभागात ५२ हजार व्हॅटचा भरणा करतात तर १.२२ लाख व्यवसाय नोंदणीधारक आहेत. गेल्यावर्षी त्यांच्याकडून १५० कोटींचा कर वसूल करण्यात आला. योजनेंतर्गत ही संख्या १.७० लाखांवर नेऊन कर वसुली १९३ कोटींवर नेण्यात येणार आहे. अग्रवाल म्हणाले, योजनेच्या समाप्तीनंतर नावनोंदणी न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. ते मागील आठ वर्षांचा कर भरण्यास जबाबदार राहतील तसेच संबंधित दंड आणि खटल्यास सामोरे जावे लागेल. (प्रतिनिधी) कुणाला भरायचा आहे व्यवसाय कर महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणारे वकील, नोटरी, वैद्यकीय व्यावसायिक, आर्किटेक्ट, अभियंते, कर सल्लागार, सीए, कमिशन एजंट, दलाल, ब्रोकर्स, कंत्राटदार, व्हॅट कायद्यांतर्गत नोंदणीकृत व्यापारी, फॅक्टरी अॅक्टखालील फॅक्टरीचे आक्युपायर्स, मुंबई शॉप अॅण्ड एस्टॅब्लिशमेंट कायद्याखालील आस्थापनाचे मालक, केबल आॅपरेटर्स, लग्न सभागृह चालविणारे किंवा माल, कॉन्फरन्स हॉल, ब्यूटी पार्लर, हेल्थ सेंटर, कोचिंग क्लासेस चालविणारी व्यक्ती, पेट्रोल, डिझेल व आॅईल पंप व सर्व्हिस स्टेशन, गॅरेज, आॅटोमोबाईल वर्कशॉपचे माल, हॉटेल्स व सिनेमागृहाचे मालक, मनीलँडर, चिटफंड चालविणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती, बँकिंग व्यवहार करणाऱ्या संस्था, सहकारी संस्था, कंपन्या, इंडियन पार्टनरशिप कायद्याखालील भागीदारी संस्थेचा प्रत्येक भागीदार व हिंदू अविभक्त कुटुंबातील प्रत्येक प्रौढ घटक अशांना व्यवसाय कर भरणे बंधनकारक आहे. अर्जाची पद्धत नाव नोंदणीसाठी शासनाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करावा लागेल. कोणतीही कागदपत्रे लाागणार नाही नाव नोंदणी क्रमांक मिळाल्यावर कर भरणा करावा लागेल. कर भरणा आॅनलाईन किंवा कोणत्याही बँकेत करता येईल.
व्यवसाय करासाठी नावनोंदणी बंधनकारक
By admin | Published: July 18, 2016 2:41 AM