लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने शहर कॉंग्रेसच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. प्रियंका प्रत्यक्ष राजकारणात आल्यामुळे पक्षाचा जनाधार वाढेल. तसेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे ‘हात’देखील मजबूत होतील, अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक जागी मिठाई वाटून जल्लोष केला.काँग्रेसला मोठी शक्ती मिळाली : नितीन राऊतकाँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत केले आहे. प्रियंका सक्रिय राजकारणात आल्यामुळे कॉंग्रेसला बळकटी येईल. त्यांच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निर्भिडता व राजीव गांधी यांच्या सौम्य व्यक्तिमत्त्वाचे मिश्रण आहे. त्यांच्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात कॉंग्रेसच्या बाजूने वातावरण तयार होईल. राहुल गांधी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.प्रियंका यांनी नागपुरातून निवडणूक लढावी : अनिस अहमदप्रियंका गांधी यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसून येते. निवडणुकांत निश्चितच याचा फायदा काँग्रेसला मिळेल. गांधी परिवाराने देशासाठी मोठे बलिदान केले आहे. प्रियंका गांधी यांनी नागपुरातून लोकसभा निवडणूक लढावी, अशी मागणी माजी मंत्री अनिस अहमद यांनी केली. यामुळे संपूर्ण विदर्भात कॉंग्रेसच्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती होईल. प्रियंका यांची प्रतिमा खरे बोलणाºया महिलेची आहे. राजकारणात त्या सक्रिय झाल्यामुळे कॉंग्रेस देशात मजबूत होईल, असे ते म्हणाले.कार्यकर्त्यांच्या उत्साह दुप्पट: विकास ठाकरेया निर्णयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. पक्षाचे तरुण कार्यकर्ते मागील काही काळापासून ही मागणी करत होते. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली आहे. यामुळे नवचेतना निर्माण झाली आहे. राहुल व प्रियंका ही भाऊ बहिणीची जोडी तरुणांना आकर्षित करेल व याचा फायदा संपूर्ण देशाला होईल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांत कॉंग्रेसला मिळालेल्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. प्रियंका गांधी यांच्या येण्याने देशात निश्चित सत्ता परिवर्तन होईल, असे मत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.नवचेतनेचा संचार : आशिष देशमुखप्रियंका गांधी यांच्या सरचिटणीस बनण्याने विदर्भ व विशेषत: नागपूरचा युवावर्ग व महिलांमध्ये नवचेतनेचा संचार झाला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल, असे माजी आमदार आशिष देशमुख यांनी सांगितले.कॉंग्रेसला मजबूत आधार मिळेल : अतुल कोटेचाप्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्यामुळे कॉंग्रेसला मजबूत आधार मिळाला आहे. लोकसभा निवडणूकीत निश्चितच याचा फायदा होईल. प्रियंका गांधी या कर्मठ व यशस्वी नेतृत्व देण्यात सफल होतील. राहुल व प्रियंका यांनी एकत्र काम केल्यामुळे कॉंग्रेस संपूर्ण देशात मजबूत होईल, अशी भावना प्रदेश कॉंग्रेसचे सचिव अतुल कोटेचा यांनी व्यक्त केली.महिलांना मिळेल प्रतिनिधित्व : प्रज्ञा बडवाईककॉंग्रेसने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही बदलाची वेळ आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांनादेखील संजीवनी मिळाली आहे. तीन राज्यांत कॉंग्रेसला मिळालेल्या यशामध्ये महिलांचा मोठा वाटा होता. प्रियंका यांच्या येण्याने पक्षात महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे, असे प्रतिपादन शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनी केले.कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती झाली : विशाल मुत्तेमवारप्रियंका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती झाली आहे. कॉंग्रेसमधील एका नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. पक्षाला आगामी निवडणुकांसाठी नवीन ऊर्जा मिळाली आहे. येणाºया काळात देशाचे नेतृत्व कॉंग्रेसचे सर्व तरुण नेते मिळून करतील, असे मत प्रदेश कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी विशाल मुत्तेमवार यांनी व्यक्त केले.मोदी-शाह जोडीचा पराभव निश्चित : वंजारीप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीमुळे तरुण व महिलांमध्ये उत्साह संचारेल. आगामी निवडणूकांत राहुल व प्रियंका यांची जोडी नरेंद्र मोदी-अमित शाह या जोडीचा पराभव करेल, असा विश्वास कॉंग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी बोलून दाखविला.कॉंग्रेसचा ‘मास्टरस्ट्रोक’ : मंदा ठवरेप्रियंका यांना सक्रिय राजकारणात आणून कॉंग्रेसने ‘मास्टरस्ट्रोक’ खेळला आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी ही जोडी कॉंग्रेस पक्षात एक नवीन वातवरण निर्मिती करेल. लोकसभा निवडणुकांत आता कॉंग्रेसचा विजय निश्चित आहे, असे मत राजीव गांधी पंचायत राज अभियंताच्या माजी प्रदेश प्रमुख नंदा ठवरे यांनी व्यक्त केले.