लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य पाहताना आधी शिवरायांच्या दर्शनमात्राने भावुक आणि रोमांचित झालेल्या प्रेक्षकांना आतुरता लागून असते ती तरुण शंभुराजेंच्या दर्शनाची अर्थात ही भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशाची. हा क्षण येतो तो नाटकीय घडमोडीतून. शिवरायांच्या हत्येचा कट उधळणाऱ्या शंभुराजांनाच या कटाची माहिती सांगणाऱ्या महिलेच्या अपहरणाचा आरोप ठेवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. तेव्हा राजदरबार भरवून राजे शिवराय शंभुराजांना आरोपी म्हणून पेश करण्याचा हुक्म सोडतात आणि अखेर तो क्षण येतो. प्रेक्षकांच्या नजरा भव्य मंचाकडे खिळल्या असतात, पण शंभुराजे म्हणजे अमोल कोल्हे प्रेक्षकांमधून वेगाने घोडदौड करीत दरबारासमोर हजर होतात. घोड्यावर स्वार शंभुराजेंचे रुबाबदार रूप पाहून प्रेक्षक अवाक् व तेवढेच रोमांचित होतात आणि एक जोश प्रत्येकामध्ये संचारतो.माजी आमदार मोहन मते यांच्या माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या रेशीमबाग मैदानावर सुरू आहे. भव्यदिव्य अशा या महानाट्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. शंभुराजेंचे रूप पाहून अंगावर काटा उभा राहतो. त्यामुळे या महानाट्यातील बारकाव्यांची उत्सुकता प्रत्येकाला लागून असते. महानाट्याला शोभेल असा हा शंभुराजेंचा प्रवेश परिपूर्ण व्हावा म्हणून परिश्रम घ्यावे लागले. डॉ. अमोल कोल्हे यांनी टीव्ही मालिकेतही संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून या जाज्वल्य व्यक्तिमत्त्वाची भूमिका जिवंत करण्यासाठी त्यांनी घोडेस्वारीही शिकून घेतली. महानाट्यात शिवराय आणि शंभुराजे यांनी जी घोडी वापरली तिचे नाव ‘पूजा’. मालिकेतही हीच घोडी त्यांच्यासोबत असून महानाट्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत राज्यभरात झालेल्या प्रयोगात तिची सोबत आहे. महानाट्यात शिवराय व शंभुराजे यांचे सहा प्रवेश घोड्यावरून आहेत. या प्रवेशाचे महत्त्व लक्षात घेउन प्रत्येकाला या रोमांचक प्रसंगाची अनुभूती घेता यावी म्हणून मैदानावर दर्शकव्यवस्थेच्या मध्ये घोडदौडीसाठी मोठा पॅसेज तयार करण्यात आला आहे. मंचासमोरही घोडे आणि हत्तीच्या भ्रमणासाठी तसेच वेगवेगळे नृत्य व क्रीडा प्रकार दर्शविण्यासाठी जागा करण्यात आली आहे. अशा अनेक भव्यतेने सजलेले महानाट्य प्रेक्षकांना अलौकीकतेची अनुभूती देते.दरम्यान बुधवारी आमदार रामदास आंबटकर, माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, भाजपाचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, राजे मुधोजी भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, अश्व व गजपूजन करून महानाट्याला सुरुवात करण्यात आली.अहमदनगरमधून आणला हत्तीमहानाट्यातील आणखी एक आकर्षणाचे केंद्र म्हणजे हत्तीचा सहभाग होय. ही मादी हत्ती अहमदनगरमधील एका मठातून आणली आहे. वनविभागाच्या आवश्यक परवानगीपासून इतर सर्व सोपस्कर पूर्ण करून तिला सामील करण्यात आल्याचे वनविभागाचे मानद सदस्य कुंदन हाते यांनी सांगितले. पाच टन वजनाचा हा अवाढव्य प्राणी सांभाळताना किती कसरत करावी लागते, हे वेगळे सांगायला नको. अगदी तिला आणल्यानंतर ट्रकमधून उतरविण्यापासून ते त्याच्या व्यवस्थेपर्यंत बारकाईने लक्ष द्यावे लागत असल्याचे हाते यांनी स्पष्ट केले. एका माहुताच्या मदतीने महानाट्यामध्ये तिचा संथपणे होणारा वावर सर्वांचे लक्ष वेधून घेतो.