नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात विविध समस्या येत असतानाही ६० वर्षांवरील नागरिक यातून मार्ग काढत आहेत. परिणामी, गुरुवारी सर्वाधिक लसीकरणाचा टप्पा ज्येष्ठांनी गाठला. ३,५३५ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर, ४५ वर्षांवरील गंभीर आजार (को-मॉर्बिडिटीज) असलेल्या ७०८ लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले. विशेष म्हणजे, दुपारी २ वाजतानंतर ‘को-विन’ वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे लसीकरण थांबले होते. परंतु केंद्र अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत प्रक्रिया ‘ऑफलाइन’ सुरू केल्याने अनेकांवर रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ टळली.
शहरातील शासकीय व खासगी मिळून २८ केंद्रांवर लसीकरण झाले. ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्या ५१० तर ६० वर्षांवरील २,५५० लाभार्थ्यांनी लस घेतली. यात मेयोच्या ‘अ’ केंद्रावर १०३, ‘ब’ केंद्रावर ९३, मेडिकलच्या ‘अ’ केंद्रावर ११३, ‘ब’ केंद्रावर ८८, एम्सच्या ‘अ’ केंद्रावर ८३, ‘ब’ केंद्रावर ११४, डागा रुग्णालयात ५७, मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयात ७०, मनपाच्या पाचपावली महिला रुग्णालयात ५९, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात २५२, कामगार रुग्णालयात १२१, केटी नगर नागरी आरोग्य केंद्रात १०७ तर, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये १०६ ज्येष्ठांनी लस घेतली.
- १३ खासगी केंद्रांवरही वाढली गर्दी
शहरातील १३ खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात होताच लाभार्थ्यांची गर्दी वाढली आहे. सर्वाधिक ज्येष्ठांचे लसीकरण सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये झाले. येथे १८५ लाभार्थ्यांनी लस घेतली. याशिवाय मोगरे हॉस्पिटलमध्ये १७०, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १६३, मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये १५०, कुणाल हॉस्पिटलमध्ये ८६, क्युअरीट हॉस्पिटलमध्ये १०, होप हॉस्पिटलमध्ये ४६, न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ७८, अर्नेजा हॉस्पिटलमध्ये ६९, केशव हॉस्पिटलमध्ये ३५, प्लॅटिना हॉस्पिटलमध्ये २९, रेडिएन्स हॉस्पिटलमध्ये ६५ तर बारस्कर हॉस्पिटलमध्ये २६ ज्येष्ठांचे लसीकरण झाले.
- ग्रामीणमध्ये ९८५ ज्येष्ठांनी घेतली लस
शहराच्या तुलनेत आता ग्रामीण भागातही ज्येष्ठांचे व ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्यांच्या लसीकरणाने वेग घेतला आहे. आज ६० वर्षांवरील ९८५ तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या १९८ लाभार्थ्यांनी लस घेतली. सर्वाधिक लसीकरण काटोल ग्रामीण रुग्णालयात झाले. येथे १६७ ज्येष्ठांनी लस घेतली तर सर्वांत कमी लसीकरण पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात झाले. येथे केवळ तीनच लाभार्थ्यांनी लस घेतली.