नागपूर : भारतीय रेल्वे रुळाचा उपयोग करून महामेट्रोची ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे नागपुरात चार शहरांमध्ये दीड वर्षांत धावणार आहे. याकरिता स्वत:ची रेल्वे खरेदी करून ब्रॉडगेजवर धावणे मेट्रोला शक्य नाही. विदर्भातील उद्योजक आणि बस ऑपरेटर्स कंपन्यांना खासगी तत्त्वावर मेट्रो खरेदी करून रेल्वेच्या ब्रॉडगेज रुळावर संचालन करता येणार आहे. उद्योजकांनो, ३० कोटी रुपयांत ब्रॉडगेज मेट्रो विकत घ्या आणि महामेट्रोच्या प्रकल्पात सहभागी व्हा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या प्रकल्पात गुंतवणुकीसाठी एमएसएमई आणि महामेट्रोच्या संयुक्त विद्यमाने रविवारी वर्धा रोडवरील महामेट्रोच्या मेट्रो स्टेशन साऊथच्या सभागृहात बस ऑपरेटर कंपन्या, उद्योजक, बँकर्स आणि अन्य गुुंतवणूकदारांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि एमएसएमई-डीआचे संचालक प्रशांत पार्लेवार उपस्थित होते.
प्रारंभी सहा डब्यांच्या ३० मेट्रो धावणार
गडकरी म्हणाले, पहिल्या टप्प्यात ब्रॉडगेज मेट्रो वर्धा, नरखेड, रामटेक आणि भंडारा येथे धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात छिंदवाडा आणि अमरावतीपर्यंत जाणार आहे. याकरिता रेल्व रुळाचे काम सुरू आहे. प्रारंभी सहा डब्यांची मेट्रो राहणार असून, या चारही मार्गांवर ३० मेट्रो रेल्वे धावणार आहेत. पुढे ही संख्या १०० वर जाईल. प्रवासी संख्या वाढल्यानंतर मेट्रो रेल्वे २२ डब्यांची होऊ शकेल. यामध्ये एसी इकॉनॉमिक व बिझनेस क्लास राहणार आहे. ताशी वेग १२० किमी राहील. त्यामुळे प्रवाशांची वेळेची आणि एसटी व व्हॉल्वो बसच्या तुलनेत पैशाची बचत होईल. या प्रकल्पाला रेल्वेची मंजुरी मिळाली असून, डीपीआर केंद्र सरकारकडून लवकरच मंजूर होईल. यासंदर्भात जुलै २०१८ मध्ये रेल्वे बोर्डाच्या चेअरमनसोबत चर्चा झाली होती. ब्रॉडगेजसाठी पाच कोटी प्रती किमी खर्च येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
मेट्रो रेल्वे खरेदीसाठी वैदर्भीयांना प्राधान्य
गडकरी म्हणाले, ब्रॉडगेज मेट्रोसाठी रेल्वेचे स्टेशन तयार आहेत. ब्रॉडगेज मेट्रो सुरू होईल तेव्हा महामेट्रो स्टेशनची देखभाल करेल. त्याकरिता गुंंतवणूकदाराला १० टक्के महामेट्रोला द्यावे लागतील. मेट्रो रेल्वेत कर्मचारी भारतीय रेल्वेचे राहतील. सहा डब्यांच्या रेल्वेतून गुंतवणूकदाराला प्रवासी तिकीट, पार्सल, फूड, जाहिरात यातून पैसे मिळतील. ब्रॉडगेज मेट्रो सेवा सकाळी ५.३० ते रात्री १२ पर्यंत सुरू राहील. प्रवाशांना एक-एक तासाने सेवा मिळेल. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, गुंतवणूकदारांना पाच वर्षांत पैसा परत मिळेल, असा विश्वास आहे. यामुळे मेट्रोची रायडरशिप पाच लाखांपर्यंत वाढेल. ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे खरेदीसाठी वैदर्भीयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतरच बाहेरील गुंतवणूकदारांचा विचार करण्यात येणार आहे. प्रवाशांना उत्तम सेवा मिळाल्यास हा प्रकल्प यशस्वी होईल आणि याची कॉपी संपूर्ण देशात केली जाईल, असे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.
मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न
मेट्रो रेल्वेत जाणीवपूर्वक बेजबाबदार कृत्य करून मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. नागपूरकरांसाठी अशी अपेक्षा नव्हती. चांगले काम करीत असताना अनेक शत्रू तयार होतात; पण याची चिंता नाही. मेट्रो चांगले आणि गुणवत्तेचे काम करीत आहे. कंत्राटदारांकडून एकही पैसा घेण्यात येत नाही. मेट्रोमुळे नागपूरच्या विकासात भर पडली आहे.
इलेक्ट्रिक बस निर्मितीचे युनिट
नागपुरात आणण्याचा प्रयत्न
इलेक्ट्रिक बस निर्मितीचे युनिट नागपुरात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बस निर्मिती करणाऱ्या कंपनीची उलाढाल दोन लाख कोटींची आहे. हा प्रकल्प आल्यास छोट्या उद्योगांना काम मिळेल.