नागपूर : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच कामगारांनी कोविडकाळात कंपन्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून कंपनी प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरून दोघांनाही लाभ होईल, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास व कामगारमंत्री बच्चू कडू यांनी येथे केले. विदर्भ सिंचन भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील विविध उद्योगांतील कामगारांच्या मागण्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
गोसी खुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी आणि कामगार या बैठकीला उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. असे असले तरीही उद्योजकांनी, कंपनी प्रशासनाने कामगारांच्याही विधायक मागण्यांचा विचार करून त्यांनी शक्य होईल, अशी अधिकाधिक मदत करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, असे आवाहन कडू यांनी यावेळी उद्योजकांना केले.
उद्योग अडचणीत असला तरीही कामगारांना दैनंदिन गरजा भागवताना त्यांची आर्थिक कुचंबणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मागील थकबाकी लवकरात लवकर कामगारांच्या खात्यात जमा करावी. ही थकबाकीची रक्कम तीन किंवा चार टप्प्यात देताना सुरुवातीला अधिकाधिक ती रक्कम कामगारांना मिळेल, याकडे विशेष लक्ष द्यावे तसेच कामगारांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही दिले. यावेळी सतरापूर गाव आणि कुही तालुक्यातील पुनवर्सित गावांमध्ये सौरऊर्जेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा तसेच भूसंपादनांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.