निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर ते महानगर व आता मेट्रो सिटी म्हणून बिरुद मिळविणाऱ्या नागपूर शहराने मिलेनियम इयर २००० पासून २० वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच काही गमावले आहे. २० वर्षांत शहर क्षेत्राची हिरवळ (ग्रीन कव्हर) तब्बल ३३ टक्क्याने घटली आहे. या काळात शहरातील १६ तलावांमधून मोठे म्हणावे असे केवळ चार तलाव शिल्लक राहिले आहेत. नद्यांचे नाल्यात रूपांतर झाले आहे आणि तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. २० वर्षांत प्रदूषण आणि भूजलस्तर स्थिर असल्याचा सकारात्मक दावा केला जात असला तरी परिस्थिती त्याहून विपरीत आहे.२००० हे वर्ष जगभरात मिलेनियम इयर म्हणून साजरे झाले होते. त्यावेळी नवे स्वप्न, नव्या वाटा स्वीकारण्याचा संकल्प प्रत्येकाने केला असेल. मात्र या नव्या वाटावर चालताना पर्यावरणाचा प्रचंड ºहास मानवाने केला आहे. त्यामुळे जगाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असून त्याचा अनुभव आपण घेत आहोतच. या २० वर्षांत नागपूर शहरात अनेक बदल घडले आहेत. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने आपण बरेच काही गमावलेही आहे. या काळात पर्यावरणाच्या घटकांमध्ये कशी स्थित्यंतरे घडली, याविषयीचा आढावा आम्ही या निमित्ताने घेतला. एका सर्वेक्षणानुसार शहराच्या केंद्रस्थानावरून ३० किलोमीटर म्हणजे ३७२ चौ.किमी.च्या परिघातील हिरवळ ३३ टक्क्याने घटली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ.किमी.चे वनक्षेत्र होते जे २०१३ मध्ये ९१ चौ.किमी व २०१८-१९ मध्ये ७६ चौ.किमी.पर्यंत घसरले आहे. म्हणजे कधी ३१ टक्के असलेले ग्रीन कव्हर २१ वर आले आहे. हीच अवस्था तलावांची झाली आहे. २० वर्षांपूर्वी १६ तलाव शहरात अस्तित्वात होते. त्यातील अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलाव सुस्थितीत आहेत तर शुक्रवारी तलाव, सोनेगाव तलाव अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यातही या तलावातील आॅक्सिजनचे प्रमाण घटले आहे.
शहराची हिरवळ कमी झाली. उद्योग, बांधकामात वाढ झाली असून वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रदूषण आणि तापमानात वाढ झाली आहे. अशात आधीच औष्णिक विद्युत केंद्र असताना आणखी विद्युत केंद्र उभारण्याचा प्रस्ताव धोकादायक आहे.- जयदीप दास, पर्यावरणतज्ज्ञ
कार्बन, सल्फर आदी प्रदूषण मर्यादेच्या वर गेले नाही ही समाधानकारक बाब आहे पण धूलिकणांचे वाढते प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढविणारे आहे. याशिवाय अत्यल्प असलेल्या तलावांचे वाढलेले प्रदूषण जैवविविधतेला हानी पोहचविणारे आहे.- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ