नागपूर : जगात जानेवारीपासून काेराेनाचा विळखा घातला आणि भारतात फेब्रुवारीपासून त्याचे परिणाम दिसू लागले, ते आता २०२० वर्ष संपल्यानंतरही सुरूच आहेत. माणसे घरात बंदिस्त झाली, शाळा बंद झाल्या, नोकऱ्या गेल्या, पायपीट झाली, अर्थशास्त्र कोलमडले, आरोग्य कोलमडले. या कोरोना वर्षाने इतके जेरीस आणले की नको अशी वेळ पुन्हा, कधी जाते एकदाचे हे वर्ष, असे वाटायला लागले. मात्र या वर्षाने एक मात्र सकारात्मक बाब करून दिली. या वर्षात आपल्या पृथ्वीने, पर्यावरणाने मोकळा श्वास घेतला. नद्या, सागर शुद्ध झाले. पक्षी, प्राणी, फुलपाखरे अशा सर्व जीवांसाठी हे वर्ष सुखावह ठरले. युरोपियन स्पेस एजेन्सीने केलेल्या सॅटेलाईट सर्वेक्षणानुसार भारतात व जगातही कार्बन, नायट्रोजन अशा प्रदूषणाचा स्तर निम्म्याने घटला. कोट्यवधी खर्च करून व अनेक वर्षे संशोधन व परिश्रम करूनही ते शक्य झाले नसते. मग हे सर्व झाले कशामुळे? या प्रश्नाचे उत्तर आहे, पर्यावरणात मानवी हस्तक्षेप आणि हव्यास कमी झाल्यामुळे. त्यामुळे येणारे २०२१ हे वर्ष आणि भविष्यातही ग्लोबल वाॅर्मिंग व प्रचंड वाढलेला प्रदूषणाचा धोका दूर करायचा असेल तर कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीप्रमाणेच नियोजन करावे लागेल. खरेतर हे आव्हान आहे पण अशक्य नाही. कोरोनाच्या प्रकोपाने हा मार्ग नक्कीच दाखवला आहे.
२०२१ मध्ये अपेक्षा
- पर्यावरणात मानवी हस्तक्षेप कमीत कमी हाेईल, यासाठी नियाेजन.
- आठवड्यात, महिन्यात किमान एक दिवस नाे व्हेईकल डे म्हणून पाळावा लागेल.
- प्रदूषण न करणारी वाहने (सायकल) वापराला प्राेत्साहन हवे. सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे.
- कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नियाेजन
- यावर्षी पहिल्यांदा नद्या आपाेआप शुद्ध झाल्या, शहरात फुलपाखरे माेठ्या प्रमाणात दिसली. ही स्थिती निर्माण करण्याची याेजना.
- कारखानदारीतून हाेणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी याेजना आखून काटेकाेर व प्रामाणिक अंमलबजावणी.