लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण तज्ज्ञ विकासविरोधी नाही आणि सरकारही पर्यावरणविरोधी नाही. जशी वृक्षांची गरज आहे, तशीच मेट्रोचीही गरज आहे. शाश्वत विकास म्हणून दोन्हींचीही गरज आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही यंत्रणांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. अन्यथा, पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे कायम शत्रूत्वाचा भाव ठेवतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात वनराई फाऊंडेशनच्या वतीने संजीव कुमार यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी व अमरावती येथील कामधेनू प्राकृतिक ऊर्जा केंद्राचे प्रमुख नंदकिशोर गांधी यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया पर्यावरण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी पर्यावरण मंडळाचे स्वानंद सोनी उपस्थित होते. व्यासपीठावर वनराईचे समीर सराफ, डॉ. पिनाक दंदे, अनंत घारड, प्रकाश तागडे, नीलेश खांडेकर उपस्थित होते.लोकशाहीमुळेच विकास होतो, असे नाही तर लोकांच्या सहभागातून शाश्वत विकास साधला जातो. लोकशाहीमध्ये नेतृत्व जसे विचार करेल, त्याअनुषंगाने विकासाचे वेगवेगळे मार्ग अस्तित्वात येत असतात. मुंबईमध्ये मेट्रोसाठी आरे वनांच्या कत्तलीवरून बराच आगडोंब उसळला. मात्र, मेट्रोही गरजेची आहे. अशास्थितीत दोन्ही यंत्रणांनी एकत्र बसून उपाय शोधला असता तर एवढा गोंधळ निर्माण झाला नसता. त्यासाठी आंदोलक आणि शासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे होते.यावर्षी गेल्या ५० वर्षात जेवढा पाऊस झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. मात्र, असे असतानाही अनेक ठिकाणांची पाण्याची तूट भरून निघाली नाही. शेकडो वर्षे आधी समाजसुधारकांनी महाराष्ट्र घडविला आणि त्याची प्रेरणा घेऊन आजही तशी माणसे घडत आहेत. मात्र, उत्तर भारतात तसे चित्र नाही. शासकीय योजना अंमलात येण्यापूर्वीच इथल्या लोकसहभागातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. तीच प्रेरणा संपूर्ण भारताला देणे गरजेचे असल्याचे डॉ. संजीव कुमार यावेळी म्हणाले. याप्रसंगी सत्कारमूर्ती कौस्तुभ चॅटर्जी व नंदकिशोर गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किशोर धारिया यांनी केले. परिचय रेखा दंडिगे-घिया यांनी करवून दिला. संचालन अजय पाटील यांनी केले. तर आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.
आंदोलक-शासन एकत्र बसेल तरच पर्यावरणाची समस्या निकाली निघेल : विभागीय आयुक्त संजीव कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:13 AM
पर्यावरण तज्ज्ञ विकासविरोधी नाही आणि सरकारही पर्यावरणविरोधी नाही. दोन्ही यंत्रणांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. अन्यथा, पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे कायम शत्रूत्वाचा भाव ठेवतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.
ठळक मुद्देकौस्तुभ चॅटर्जी आणि नंदकिशोर गांधी यांना ‘मोहन धारिया पर्यावरण पुरस्कार’