नागपूर : पर्यावरणाबाबत अनेक नकारात्मक गाेष्टी घडत असताना काही माणसे मात्र प्रामाणिकपणे पर्यावरण संवर्धनासाठी धडपड करीत आहेत. त्यांतील एक नाव म्हणजे एकनाथ पवार. या अवलियाने 'माझी वसुंधरा - माझी जबाबदारी' ही संकल्पना मनात ठेवत वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रजातींच्या २० हजारांहून अधिक झाडांची लागवड केली.
वनमहोत्सव व कृषिदिन पर्वात वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन प्रशिक्षण संस्था (वन्हार्टी) या संस्थेच्या सहयोगातून थेट बांधावर, पडीक जमिनीवर वृक्षलागवड, मोफत वृक्षभेट उपक्रम राबवून हरित महाराष्ट्राचा संदेश देण्याचे व्रत पवार यांनी जपले आहे. शालेय व ग्राम स्तरांवर वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाला प्रोत्साहित करण्यासाठी विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन केले. सामाजिक वनीकरणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामस्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन केले. वृक्ष रक्षाबंधन, वृक्षदिंडी, एक मूल - एक झाड, करूया हरितसंकल्प, इको स्कूल टू व्हिलेज, पोस्टर स्पर्धा अशा उपक्रमांचे आयाेजन केले.
पक्ष्यांसाठी पाणपाेई
उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता पाण्याअभावी पक्ष्यांचे मृत्यू होऊ नये म्हणून अनेक वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात झाडांवर शेकडो पाणपोया उभारण्याचे काम केले. मोफत जलपात्रांचे वितरणही केले.
हजारो सिलबाॅड निर्मिती व बियांचे संकलन
दरवर्षी उन्हाळ्यात विविध प्रजातींच्या बियांचे संकलन करणे, सिडबाॅल्स निर्मिती करणे हा नित्य उपक्रम. पवार यांनी पळस, करंजी, सीताफळ, देशी बाभूळ, कडूनिंब, जांभूळ, चिंच, बेहडा, बेल, महारुक्ष, आईन अशा विविध प्रजातींचे बिया संकलित केल्या व सीडबाॅल्समध्ये रूपांतर करून गुराख्यांना देऊन जंगलात, नदीकाठी, ओढ्याकाठी रोपण करण्याचा अभिनव उपक्रम एक सामाजिक बांधीलकी म्हणून राबविला.