शाहनवाज आलम
नागपूर : नागपुरात हजारो पीएफधारकांनी आतापर्यंत आपले ई-नॉमिनेशन भरलेले नाही. यासंदर्भात केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने ३० एप्रिल ही अंतिम तारीख दिली आहे. यासंदर्भात स्थानिक स्तरावर पीएफ कार्यालयाने सूचना जारी केली आहे. या तारखेपर्यंत ई-नॉमिनेशन न केलेल्या खातेदाराला अडचणी येणार आहेत. कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन करण्याकरिता पीएफ विभाग जानेवारीपासून सतर्क करीत आहे. पण, अनेकांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
छोटी कंपनी आणि मजूर वर्गातील लोक जास्त
नागपूर पीएफ कार्यालयातील अधिकारी म्हणाले, ई-नॉमिनशन न करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक लहान कंपन्यांचे कर्मचारी आणि मजूर आहेत. पीएफचा कमी पैसा जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ई-नॉमिनेशन अजूनही भरलेले नाही. मोठ्या कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे ई-नॉमिनेशन प्राप्त झाले आहे.
घरबसल्या करू शकता ई-नॉमिनेशन
ई-नॉमिनेशन घरबसल्या करता येते. सर्वप्रथम ईपीएफओची अधिकृत वेबसाईट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जावे. यावर ‘सर्व्हिस’ पर्याय निवडून यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरून नॉमिनेशन पर्यायात खातेदाराला १२ अंकी आधार नंबर, नाव, पत्ता आणि जन्मतारीख भरायची आहे. खातेदाराला ‘सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन’च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. कंपनीतर्फे प्रत्येक महिन्यात पीएफ खात्यात पैसे जमा करण्यात येतात. ही रक्कम खातेदार ऑनलाईन मेंबर पासबुकच्या माध्यमातून पाहू शकतो.
यामुळेच ई-नॉमिनेशन आवश्यक
पीएफ खातेदाराचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यातील पैसा नामांकित व्यक्ती अर्थात ‘नॉमिनी’ला मिळतो. पण, त्याआधी खातेदाराला ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक आहे. ते न केल्यास खातेदार अथवा ‘नॉमिनी’ला पैसे काढण्यास अडचण येऊ शकते. याशिवाय कोणत्याही कारणांनी पीएफ खाते बंद करायचे असेल तर खातेदाराला ई-नॉमिनेशन केल्याशिवाय खाते बंद करता येणार नाही.