लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचारी भविष्य निधीचे (ईपीएफ) नागपूर क्षेत्रात एकूण १५ लाखाहून अधिक भविष्य निधी (पीएफ) खाते असून, त्यातील ११७७६ खाते १२ फेब्रुवारीपर्यंत दाव्याविना (इन ऑपरेटिव्ह) आहेत, अशी माहिती नागपूर प्रादेशिक विभागाचे आयुक्त १ विकास कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमुळे नागपूर प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबाबत दिलेल्या मुदतीत न्यायालयात उत्तर सादर करणार असल्याचे विकास कुमार यांनी सांगितले. नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या संशोधनानुसार ५५ वर्षावरील कर्मचाऱ्याकडून पीएफ स्वीकारला जात नाही. त्यानंतर पुढील तीन वर्षे म्हणजे ३६ महिने त्यावर व्याज दिले जाते. दरम्यान त्यावर संबंधित कर्मचाऱ्याने दावा न सादर केल्यास तीन वर्षानंतर ते खाते ‘इन ऑपरेटीव्ह’ म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर त्या खात्यावर व्याज देणे बंद होते. एखादा कर्मचारी मृत झाल्यानंतर पुढील तीन वर्षे कुणी दावा न केल्यास ते खातेही ‘इन ऑपरेटीव्ह’ म्हणून घोषित करण्यात येते. परंतु दावा सादर न करण्याची शक्यता अगदी कमी पाहावयास मिळते. अशा खात्यांमधील ३५१ कोटी रुपये नागपूर कार्यालयात जमा असून ते सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, विशेष म्हणजे आता पीएफवर अडीच लाख रुपये विमा देण्यात येत असून पेन्शनही सुरु करण्यात आली आहे. भारतात काही खात्यांवर कुणाचेच दावे आले नसल्यामुळे भारत सरकारने असे खाते ‘इन ऑपरेटीव्ह’ म्हणून घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्मचारी भविष्य निधी नागपूरचे सुरेंद्र आझाद, देवेंद्र सोनटक्के, निरंजन सरसिया उपस्थित होते.