संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर
By कमलेश वानखेडे | Published: November 8, 2024 03:51 PM2024-11-08T15:51:53+5:302024-11-08T15:56:02+5:30
भूपेश बघेल यांची टीका : नक्षलवाद्यांकडून काँग्रेसचे मोठे नुकसान
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नोटवर्क
नागपूर : नक्षलवाद्यांनी जेवढे नुकसान काँग्रेस पक्षाचे केले आहे तेवढे कोणाचेच केले नाही. छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये मंत्र्यांसह अनेक नेते आम्ही गमावले आहेत. नक्षली संविधान मानत नाहीत आणि भाजप संविधान नष्ट करू पाहत आहे. या दोघांमध्येही समानता आहे, अशी टीका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.
भूपेश बघेल शुक्रवारी सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलता म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही हे सरकार अवैध असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी हे संविधान संमेलन करत आहे. राहुल गांधींचा वाढत्या आलेखामुळे भाजप घाबरली आहे. भाजपने संविधान बदलण्याचे भाष्य केले. लोकसभेत विषय चर्चेला आला. आता संविधान रक्षासाठी पक्ष आणि अनेक संघटना सोबत आल्या आहेत. फडणवीस यांनी संविधानाच्या पुस्तकाचा नक्षली रंग असल्याचे वक्तव्य केले. लाल रंगापासून फडणवीस यांना काय त्रास आहे. लाल रंग देवीच्या ओढणीचा आहे, बजरंग बलीचा आहे, सूर्याचा उगवताना आणि मावळताना रंग लाल आहे. राहुल गांधींच्या संमेलनात दिला तो नोट पॅड होता, भाषणाचे पॉइंटर लिहण्यासाठी तो दिला होता. त्या रंगावर का जाता, पहिले हिरव्या रंगाचा त्रास होता, आता लाल रंगाचा त्रास आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नैराश्यात आले आहे, असा चिमटा त्यांनी घेतला. कंटेंगे बटेंगे म्हणतात. इथे तोडण्याची नाही तर जोडण्याची चर्चा झाली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. महाविकास आघाडी सरकार लाडकी बहीण योजना बंद करेल, अशी टीका करत आहेत. पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना आणली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. विकास ठाकरे, अ.भा. काँग्रेसचे महासचिव रामकिशन ओझा, प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
गडकरींचा भाजपकडून अपमान
देशाता संवैधानिक व्यवस्था लागू आहे पण प्रत्यक्षात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती आहे. जो विरोधात बोलतो, लिहितो त्यावर ईडी, सीबीआय लावली जाते. नितीन गडकरी यांनी स्वत:च्या स्थितीबद्दल सांगावे. गडकरी यांचा जेवढा अपमान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला तेवढा यापूर्वी कधीही कुठल्याच पार्टीने केला नाही, असा टोलाही बघेल यांनी लगावला.