घ ट ना क्र म८ आॅगस्ट २०१४ पासून डॉ. मुकेश चांडक यांच्या दोसरभवन चौकातील डेन्टल क्लिनिकमध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्या राजेश दवारे याने कामावर येणे बंद केले होते. आर्थिक घोटाळे करायचा. युग क्लिनिकमध्ये कॉम्प्युटरवर गेम खेळताना त्याच्या खुर्चीचा धक्का लागला की, राजेश त्याला मारहाण करायचा. तो युगचा तिरस्कार करायचा. मारहाणीबाबत युगने वडिलास सांगताच डॉ. चांडक यांनी राजेशला खडसावले होते. मित्र संदीप कटरे याला राजेशने युगच्या अपहरणाची योजना सांगितली होती. १ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ११, चांडक यांची दोन्ही मुले धृव आणि युग शाळेत गेली होती. धृव हा शाळेच्या बसने तर युग कारने शाळेत गेला होता. त्याला ड्रायव्हर राजू तोटेने सोडून दिले होते. चांडक यांच्या पत्नी प्रेमल ह्याही क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. १ सप्टेंबर २०१४ रोजी ३.४५ वाजताच्या सुमारास राजेशचे लाल रंगाचा टी शर्ट घालून जांभळ्या रंगाच्या स्कूटीने आलेल्या अरविंद सिंग याने ‘पप्पा क्लिनिक मे जल्दी बुला रहे है’, असे खोटे सांगून छापरूनगर गुरुवंदना अपार्टमेंटसमोरून युगचे अपहरण केले होते. ही बाब चौकीदार अरुण मेश्रामने सांगितली होती. रस्त्याच्या कडेला उभा असलेला राजेशही स्कूटीवर बसला होता. दोघे युगला घेऊन रवाना झाले होते. गुरुवंदना बिल्डिंगजवळ जळाऊ लाकडाच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या राजन तिवारी याने दोन जण एका लहान मुलाला घेऊन स्कूटीने दानागंजच्या दिशेने गेल्याचे सांगितले होते.१ सप्टेंबर २०१४ सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास डॉ. मुकेश चांडक यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात फोन करून आपला मुलगा युगचे अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण केल्याची सूचना दिली होती. तत्पूर्वी ड्रायव्हर राजू तोटेने क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी युगला नेल्याचे डॉ. चांडक यांना सांगितले होते. रात्री ८.१७ वाजता चांडक यांना सार्वजनिक टेलिफोन बुथवरून १० कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन आला होता. नंतर ८.३८ वाजता दुसऱ्या फोन बुथवरून ५ कोटीच्या खंडणीचा फोन आला होता.राजेश आणि त्याचा मित्र अरविंद एका छोट्या मुलाला घेऊन स्कूटीने घरी आल्याचे राजेशच्या शेजारी राहणारी मानलेली मामी रुपाली कनसरे हिने पाहिले होते. तिने त्याबाबत हटकलेही होते. त्यामुळे युगला घरीच ठेवून खंडणी मागण्याची राजेशची योजना फिसकटली होती. त्यामुळे त्यांनी मोटरसायकल काढून ते तडक मोटरसायकलने युगला घेऊन रवाना झाले होते.लोणखैरीकडे युगला घेऊन जाताना राजेशने कोराडी मार्गावरील सुंदर आॅटो सेंटर पेट्रोल पंपवरून मोटरसायकमध्ये पेट्रोल भरले होते. हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यांना मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरणाऱ्या माधुरी धवलकर आणि पंप मॅनेजरने ओळखले होते. २ सप्टेंबर २०१४ रोजी डॉ. चांडक यांनी राजेश दवारे याच्यावर शंका व्यक्त केल्याने दुपारी राजेशला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. राजेशने गुन्ह्याची कबुली देऊन अरविंदचे नाव उघड केले होते. दोघांनाही सायंकाळी ७.१० वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली होती. रात्री ९.१५ वाजता आरोपींनी पोलीस, पंच यांना घटनास्थळाकडे नेले होते. डॉ. चांडकही त्यांच्या सोबत होते. आरोपींनी त्यांना बाभुळखेडाकडे जाणाऱ्या पाटणसावंगी वळणापर्यंत नेले होते. राजेशने नाल्याजवळ थांबण्यास सांगितल्यानंतर पुलाखाली नेऊन मुलाला गाडल्याची जागा दाखवली. युगला त्यांनी पुरलेले होते. रेती आणि पालापाचोळ्याने मृतदेह झाकलेला होता. चेहऱ्यावर मोठा दगड ठेवलेला होता. मुकेश चांडक यांनी आपल्या युगला ओळखले होते. युगच्या खुनाच्या पूर्वी पाटणसावंगी भागात नामदेव ढवळे, शाळकरी मुले दिव्या चंदेल आणि अन्य लोकांना दोन्ही आरोपी मोटरसायकलवर लहान मुलाला घेऊन दिसले होते. माजी पोलीस पाटील श्रीराम खडतकर यांनाही हे आरोपी एका लहान मुलाला खांद्यावर उचलून लोणखैरीच्या पुलाखाली जाताना दिसले होते. जरीपटका येथील मोबाईल रिचार्ज शॉपीचे मालक मोहनलाल बालानी यांनी अरविंद सिंगला ओळखून यानेच कॉईन बॉक्सवरून पाच कोटींची मागणी होती, असे सांगितले होते. तो १ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास माझ्या दुकानात सायकलने आला होता. फोन करायचा आहे, असे तो म्हणाला होता. त्याने १० रुपयाची नोट देऊन १० ‘कॉईन घेतले होते. ‘पाच करोड लेकर आ’, असे तो फोन करणाऱ्याला म्हणाला.
युग चांडक अपहरण व हत्याकांड
By admin | Published: May 06, 2016 2:58 AM