नागपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांचे अंदाज धुळीला मिळवत भाजपने चौथ्यांदा सत्ता काबीज केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मतांमध्ये १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमधील स्थानिक व प्रादेशिक पक्षांची सद्दीच यंदा संपल्याचे चित्र आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या पारड्यात ८८ टक्क्यांहून अधिक मते आली आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
२०१८ च्या निवडणुकीत भाजपला ३२.९७ टक्केच मते मिळाली होती. मात्र, यंदा त्यात १३.३ टक्क्यांनी वाढ होत तो आकडा ४६.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. काँग्रेसची ६८ वरून थेट ३५ जागांवर घसरण झाली असली तरी मतांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही. २०१८ मध्ये काँग्रेसला ४३.०४ टक्के मते मिळाली होती. यंदा त्यात किंचित घट झाली व पक्षाला ४२.२३ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना ८८.५० टक्के मते मिळाली असून, प्रादेशिक व स्थानिक पक्षांच्या झोळीत केवळ ११.५ टक्के मतेच गेली आहेत. २०१८ मध्ये प्रादेशिक पक्षांनी चांगली कामगिरी करत २३.९९ टक्के मते घेतली होती. यंदा त्यांची प्रचंड पीछेहाट झाली असून, अनेक पक्षांचा अक्षरश: सफाया झाला आहे.
- जोगींच्या पक्षाला मोठा धक्का
माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी स्थापन केलेल्या जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे (जेसीसीजे) २०१८ साली पाच उमेदवार निवडून आले होते व पक्षाला ७.६१ टक्के मते मिळाली होती. यंदा मात्र पक्षाची पाटी कोरीच राहिली व केवळ १.२३ मतांवर समाधान मानावे लागले. जोगींचे पुत्र अमित जोगी यांच्या चेहऱ्याला जनतेने नाकारल्याचेच चित्र दिसून आले.
- नक्षलग्रस्त भागात डाव्यांचे कंबरडे मोडलेदक्षिण छत्तीसगडमधील अनेक जागा नक्षलग्रस्त भागात येतात. तेथे मान्यता नसलेले मात्र डाव्यांचा वरचष्मा असलेले अनेक पक्ष आहेत. शिवाय, सीपीआय (एम) व सीपीआयदेखील आहे. यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना केवळ ०.४३ टक्के मते मिळाली आहेत.
- ‘नोटा’च्या पर्यायाकडे पाठ२०१८ मध्ये छत्तीसगडमध्ये १.९८ टक्के म्हणजेच २.८२ लाख मतदारांनी ‘नोटा’चा प्रयोग केला होता. मात्र, यावेळी मतदारांनी ‘नोटा’पेक्षा त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला मत देण्यावर भर दिला. ‘नोटा’ची टक्केवारी १.२६ टक्क्यांवर घसरली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘नोटा’ऐवजी ‘अव्हेलेबल बेस्ट’ला मतदान करण्याचे आवाहन केले होते हे विशेष.
- बसपाच्या हत्तीचा वेग मंदावलाछत्तीसगडमधे मागील निवडणुकीत बसपाचे दोन उमेदवार निवडून आले होते. यंदादेखील बसपाला मोठी आशा होती. मात्र, प्रत्यक्षात बसपाच्या खात्यात केवळ २.०५ टक्केच मते आली. मागील वेळच्या तुलनेत बसपाच्या मतांमध्ये दोन लाखांहून अधिक घट झाली आहे.
प्रमुख पक्षांना मिळालेली मते (टक्केवारी)
पक्ष : मते (२०२३) : मते (२०१८)
भाजप : ४६.२७ : ३२.९७काँग्रेस : ३२.२३ : ४३.०४बसपा : २.०४ : ३.८७जेसीसीजे : १.२३ : ७.६१आप : ०.९३ : ०.८७सीपीआय : ०.३९ : ०.३४सीपीआय (एम) : ०.०४ : ०.०६सपा : ०.०४ : ०.१५नोटा : १.२६ : १.९८इतर : ५.५५ : ९.११