लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने शासकीय कार्यालयासाठी अथवा शासकीय योजनांच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जेम्स ही प्रणाली राबविली आहे. पण जि.प.मध्ये ही प्रणाली हाताळण्याकरिता टेक्नोसॅव्ही कर्मचाऱ्यांच्या अभाव आहे. त्याचा फटका आता विविध विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांना बसतो आहे. जेम्स प्रणालीत एरर आल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला सव्वाकोटीच्या फेरनिविदा मागवाव्या लागत आहेत.जिल्हा परिषदेत जेम्स प्रणालीवर निविदा भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि तंत्रज्ञांचा अभाव आहे. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाला सव्वाकोटींच्या कामांच्या फेरनिविदा मागविण्याची वेळ आली़ या प्रकारामुळे लाभार्थ्यांना वेळेत पोहोचणाऱ्या योजना उशिरा मिळण्याची शक्यता आहे़ ही कासवगती अशीच राहिल्यास लोकपयोगी योजना पूर्णत: लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याचीही भीती व्यक्त होत आहे़ महिला बालकल्याण समिती पदाधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़ वाहन चालविणे आणि एमएससीआयटी संगणकीय अभ्यासक्रम प्रशिक्षण व अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्यांना खेळणी साहित्य वाटपाच्या योजनांचा यामध्ये समावेश आहे़ डिसेंबर महिन्यात या कामांच्या निविदा जेम्स या ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्यात आल्या होत्या़ महिला व बालकल्याणच्याच काही कुशल कर्मचाऱ्यांनी ही सर्व प्रक्रिया केली़ परंतु, जेव्हा या प्रणालीवरून निविदा उघडण्याची वेळ आली़ त्यावेळी संपूर्ण सिस्टम लॉक दाखवित होती़ वारंवार तसा संदेश या प्रणालीवर यायचा़ ही बाब जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आली़ परंतु, तंत्रज्ञानापुढे अधिकाऱ्यांनी हात टेकले़ विभागाच्या विषय समिती बैठकीतही हा मुद्दा चर्चिला गेला़ त्यावेळी डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय कुण्याही पदाधिकाऱ्यांकडे पर्याय नव्हता़ आणखी या निविदा प्रक्रियेला आठवडा जाईल, असे या विभागाचे विभागप्रमुख सांगतात़जेम्समुळे अडचणी वाढल्यापूर्वी निविदांचे कार्य सुरळीत होण्यासाठी विशेष कक्ष निर्मिती आणि तंत्रज्ञ नियुक्तीला होते़ आता हा कक्षच गुंडाळण्यात आला़ तो का बंद झाला हे कळायला मार्ग नाही़ जेम्स प्रणालीमध्ये अजूनही पारदर्शकता नाही. त्यामुळे हा प्रकार सर्वच विभागात सुरू आहे़ आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कामाची गती वाढवायची असेल तर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणे गरजेची आहे, अशी मागणी काही जि.प़. सदस्यांकडून पुढे आली आहे़ निविदा या प्रणालीवरून करप्ट झाल्याची बाब खरी आहे़ लाभाच्या योजना तत्काळ कार्यन्वित व्हाव्या, यासाठी फेरनिविदा करण्यात आल्यात़ पुढील आठवड्यापर्यंत त्या प्रत्यक्षात उतरतील़ भागवत तांबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग