लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयआरएस अधिकाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले डॉ. अनुप कुमार श्रीवास्तव यांनी जीएसटीमधील त्रुटींचे खापर आयएएस लॉबीवर फोडले आहे. जीएसटीअंतर्गत कर प्रणाली क्लिष्ट झाली आहे. बोगस इन्व्हॉईसची प्रकरणे वाढत आहेत. सरकारजवळ कराचा निधीच पोहोचत नाही. दुसरीकडे याचे नियंत्रण आयएएस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. कर प्रणालीबाबत अनुभवाची कमी असल्याने ते त्यात बदल करण्यास तयार नाहीत, असा दावा श्रीवास्तव यांनी केला.
नागपुरात आले असता डॉ. श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. देशातील सध्याची स्थिती पाहता सेवानिवृत्तीनंतर मी राष्ट्रवादी विकास पक्षाची स्थापना केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीने उतरेल. भाजप देशाच्या नावावर समाजाला विभाजित करण्याचे काम करत आहे. विविध जाती, भाषा, धर्माच्या लोकांना जोडून अखंड भारताचे निर्माण होऊ शकते, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. पक्षात सेवानिवृत्त झालेले अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. शिवाय, सैन्यात सेवा दिलेले सदस्यदेखील आहेत. मतांच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही. आम्ही सत्ता नव्हे तर सेवेच्या उद्दिष्टाने राजकारणात आलो आहे, असे डॉ. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
लखनऊ, वाराणसीसाठी थेट विमान, रेल्वे हवी
नागपुरात उत्तर प्रदेशातील अनेक लोक राहतात. मात्र, लखनऊ किंवा वाराणसीसाठी येथून थेट विमान नाही. सोबतच नागपुरातून सुरू होऊन उत्तर प्रदेशात जाणारी रेल्वेगाडीदेखील नाही. कमीत कमी नागपुरातून लखनऊ किंवा वाराणसीसाठी थेट विमान किंवा रेल्वे सुरू झाली पाहिजे, असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले.
आवश्यक वस्तू अधिनियम लागू व्हावा
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरदेखील डॉ. श्रीवास्तव यांनी भाष्य केले. शेतकरी कायद्यात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर अवैध सावकारांची संख्या वाढेल व शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरणार नाही. आवश्यक वस्तू अधिनियमात सूट दिल्यामुळे महागाई वाढत आहे. त्याच्या तरतुदींची कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कोरोनाच्या मृत्यूची प्रकरणे लपवली
प्रशासनाच्या हलगर्जीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली. उत्तर प्रदेशातदेखील स्थिती प्रचंड गंभीर झाली. कोरोना काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदीत वाहणारे शव याचेच संकेत देत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मृत्यूची प्रकरणे लपवली, असा आरोप डॉ. श्रीवास्तव यांनी केला.