लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चाचणी केंद्र तसेच खासगी प्रयोगशाळांमध्ये संशयितांची गर्दी वाढत आहे. मात्र नमुने दिल्यानंतर अहवालासाठी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. इतकेच नाही तर अनेकांचे नमुने प्रयोगशाळांमधून गायब होत आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. सोबतच मनपाच्या चाचणी केंद्रांवरदेखील अशाप्रकारच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मेडिकल कॉलेजच्या वॉर्ड क्रमांक ६७ मध्ये शुक्रवारी (दि. २३) इमरान हुसैन नावाच्या व्यक्तीची चाचणी झाली. अहवाल २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता देण्यात येईल, असे त्याला सांगण्यात आले. ज्यावेळी संबंधित व्यक्ती अहवाल घेण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला दुपारी १ वाजता येण्यास सांगितले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता बोलविण्यात आले. मात्र तरीदेखील यादीमध्ये त्याचे नाव नव्हते. मेडिकलमध्ये विचारणा केली असता सोमवारच्या यादीत त्याचे नाव येईल, असे सांगण्यात आले. मात्र सोमवारीदेखील त्याचे नाव आले नाही. मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला परत नमुना देण्यास सांगितले. जर संबंधित व्यक्तीला संसर्ग असेल तर त्यामाध्यमातून या कालावधीत अनेक जणांना बाधा होण्याची शक्यता आहे.
हुडकेश्वर स्थित सौरभ सिरपूरकर सोबतदेखील अशीच घटना झाली. ते मागील तीन दिवसांपासून यादीत नाव शोधण्यासाठी मेडिकलमध्ये चकरा मारत आहेत. नेहरूनगर येथील संजयकुमारसोबतदेखील असेच घडले आहे. नागपुरातील अनेक जणांना अशी नाहक पायपीट करावी लागत असून, त्यांना मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे.
याद्या अस्ताव्यस्त स्थितीत
मेडिकलमध्ये दररोज १८०० ते दोन हजार नमुन्यांची तपासणी होत आहे. यामुळे तेथे तपासणीसाठी आलेल्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांच्या नावाची यादी लावली जाते. मात्र याद्यादेखील व्यवस्थित राहत नाहीत. काही याद्या तर डस्टबिनमध्ये अस्ताव्यस्त दिसतात. यामुळे नागरिकांना शोधाशोध करावी लागते.
चार दिवसांत मिळत आहेत अहवाल
खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करणाऱ्यांना चार दिवस अहवालासाठी थांबावे लागत आहे, तर मनपाच्या तपासणी केंद्रांमध्येदेखील अहवालासाठी लोकांना चकरा माराव्या लागत आहेत.