नागपूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. अनिल गोवारदीपे यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाला निवेदन सादर करून नागपूरमध्ये राष्ट्रीय वकील अकादमी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व वकिलांच्या विकासाकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ही मोहीम आणखी पुढे नेण्याची गरज आहे. सध्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नियुक्तीकरिता परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर न्यायाधीश होणाऱ्या वकिलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्यासंदर्भात अनेक तक्रारी कौन्सिलकडे आल्या आहेत. तसेच, वकिलांनाही चांगल्या दर्जाच्या प्रशिक्षणाची गरज आहे. ही बाब लक्षात घेता नागपूरमध्ये राष्ट्रीय वकील अकादमी स्थापन करण्यात यावी. नागपूर देशाच्या केंद्रस्थानी आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगड ही दोन राज्ये नागपूरपासून जवळ आहेत. त्यामुळे या राज्यातील वकिलांनाही सदर अकादमीचा फायदा होईल. अकादमीसाठी नागपूरमध्ये जागा उपलब्ध आहे. परिवहनाच्या दृष्टिकोनातूनही नागपूर सर्वांसाठी सोयीचे ठिकाण आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.