लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नुकताच आकाशातील मेघांनी अंथरलेला चिंब गालिचा... चौफेर दरवळणारा धूपबत्तीचा गंध व त्यात पसरलेल्या भक्तिमय स्वरांनी प्रसन्न झालेले वातावरण...चांद्रयान मोहिमेचा चित्ताकर्षक व अंतराळाचा नयनरम्य असा देखावा... भगव्या पताका उंचावत निनादणारे ढोलताशांचे वादन... आणि ‘सर्व मंगल मांगल्ये शिर्वे सर्वार्थ साधिके...’च्या अखंड गजरात रविवारी महिषासूर मर्दिनी-जगत्जननी-आदिशक्ती दुर्गा मातेची अतिशय उत्साहात स्थापना झाली. व्हॉलिबॉल मैदान, लक्ष्मीनगर येथे शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पहिली आरती करीत या मंगलमय उत्सवाला सुरुवात झाली. याप्रसंगी लो
कमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, महापौर नंदा जिचकार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर व भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्ना मोहिले, वानखेडे मॅडम्स अकादमीचे संचालक नरेंद्र वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन आणि धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाच्या आयोजनात लोकमतचे सहकार्य लाभले आहे.शिवशाहीर पुरंदरे व विजय दर्डा यांनीही या देखाव्याचे भरभरून कौतुक केले. सुरुवातीला बाबासाहेब पुरंदरे व इतर मान्यवर तसेच मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मातेची पहिली आरती केली. यानंतर विजय दर्डा यांनीही दुर्गा मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी प्रसन्ना मोहिले व सहकाऱ्यांनी बाबासाहेब पुरंदरे व विजय दर्डा यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.बाबासाहेब म्हणाले, जवाहरलालजींच्या चिरंजीवाला भेटून आनंद झालालोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी जेव्हा महाराष्टÑभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटून नमस्कार केला तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या चिरंजीवाला भेटून मला अत्यंत आनंद झाला आहे. बाबूजींसोबत माझे बोलणे व्हायचे. यवतमाळ येथील मातोश्री निवासस्थानी आलो होतो व नागपूरच्या लोकमत भवन येथेही त्यांची भेट घेतली होती. लोकमत नावाचे रोपटे त्यांनी लावले होते आणि आज या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला, ही गोष्ट माझ्यासाठी आनंददायी आहे, अशी भावना त्यांनी विजय दर्डा यांच्याजवळ व्यक्त केली.