नागपूर : खासगी रुग्णालयांतर्फे कोरोनाबाधित रुग्णांचे उपचार करताना शासनाने निश्चित केलेल्या विहित दरापेक्षा जास्त दर आकारण्यात आले आहेत, अशा तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी स्थापित समितीचा कक्ष महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थित सामान्य प्रशासन विभाग येथे सुरू करण्यात आला आहे. यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाइकांना बिलासंदर्भात तक्रार करायची असल्यास या कार्यालयामध्ये लेखी तक्रार करावी. सोबतच खासगी रुग्णालयाचे बिल, रुग्णाचा केसपेपर जोडावा आणि संपर्क क्रमांक नमूद करावा, असे आवाहन केले आहे.
समिती तक्रार प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत बिलाची तपासणी करून आपले अभिप्राय आयुक्तांकडे सादर करणार आहे. समितीत शासकीय अधिकारी, डॉक्टर, लेखाधिकारी, आदींचा समावेश आहे.