लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा येत्या नोव्हेंबर व डिसेंबर २०२० या कालावधीत होणार आहे. तोंडी परीक्षेला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर लेखी परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षेची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात संकलन केंद्राची स्थापना केली आहे. यात लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय भंडारा, नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली, जिल्हा परिषद ज्युबिली कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागभिड, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वर्धा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, धर्मराव विद्यालय आलापल्ली, हितकारणी विद्यालय आरमोरी आणि गुजराती नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया येथे प्रवेशपत्र संकलन केंद्र तयार करण्यात आली आहे. परीक्षेचा कालावधी कमी असल्याने यावेळी प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ‘ऑऊट ऑफ टर्न’ ने आयोजित करता येणार नाही. ७ ते १२ डिसेंबरदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण, कार्यानुभवाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रांनी त्यांच्या स्तरावरुन आयोजित करावी, पत्रव्यवहार व साहित्य पाठविण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क भरावे लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य निर्धारित तारखेस मंडळ कार्यालयात जमा करण्याचे निर्देश विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी दिले आहे.