नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्त्वज्ञान शिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला केंद्र सरकारने तात्त्विक मंजुरी दिली आहे. विद्यापीठाचे कुलपती प्रा. रजनीशकुमार शुक्ला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्रामध्ये यावर्षीपासून स्नातक व संशोधनपर अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. पुढे स्नातकोत्तर अभ्यासक्रम सुरू केले जातील. याकरिता शिक्षणतज्ज्ञांचे सहकार्य मिळत आहे. यासंदर्भात नवी दिल्ली येथील भारतीय तात्त्विक संशोधन परिषद, राष्ट्रीय पुस्तक न्यास, म्हैसूर येथील भारतीय भाषा संस्थान व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या केंद्रामध्ये मराठी भाषेचा वैज्ञानिक अभ्यास, मराठी भाषेचा अन्य भारतीय भाषांसोबत तुलनात्मक अभ्यास, मराठी साहित्य व इतर भाषांतील साहित्यांचा तुलनात्मक अभ्यास, भाषांतर, धर्म व संस्कृतीचा अभ्यास होईल, असे प्रा. शुक्ला यांनी सांगितले.
कारंजेकर बाबा यांनी रिद्धपूर येथे सुमारे ५ हजार ५०० हस्तलिखित ग्रंथ असल्याची माहिती दिली. या केंद्रामुळे ग्रंथांना प्रसिद्धी मिळेल. आता राज्य सरकारनेही रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मनपाचे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी या केंद्राला केंद्र सरकारकडून ३० कोटी रुपये अनुदान मिळाल्याची माहिती दिली. याप्रसंगी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष कापुसतळणीकर बाबा, वायंदेशकर बाबा, प्रा. दिनेश सूर्यवंशी, प्रा. कृपाशंकर चौबे आदी उपस्थित होते.