लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये कोरोना संक्रमण काळात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले.जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे उत्पादक, ऑक्सिजन निर्मिती होत असलेले सर्व कारखाने,ऑक्सिजनचे मोठे पुरवठादार,या सर्वांशी ही समिती समन्वय ठेवणार आहे. या समितीमार्फत जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता, पुरवठा व संनियंत्रणाचे कार्य पार पाडले जाणार आहे. यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधता येणार आहे.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. या समितीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालयाचे परिवहन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य राहतील. तर सदस्य सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासन नागपूर या विभागाचे सहायक आयुक्त काम पाहतील. कोणत्याही जिल्ह्यामध्ये आॅक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हास्तरावर ही समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:30 PM