नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठ्ठा दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या ‘नागपूर दुर्गा महोत्सव २०२१’मध्ये यंदा दुर्गादेवीची स्थापना हेमाडपंथी मंदिरात करण्यात आली आहे. या महोत्सवाला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी भेट देऊन दुर्गादेवीचे दर्शन घेतले.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नागपूर दुर्गा महोत्सव अत्यंत मर्यादित स्वरूपात साजरा झाला होता. संक्रमणाच्या आकांडतांडवात गेल्या वर्षी भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नव्हते. यंदा मात्र, संक्रमण ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक आयोजनांना परवानगी मिळाल्याने कोरोना प्रोटोकॉल पाळत हा महोत्सव साजरा होत आहे. सोमवारी विजय दर्डा आणि राकेश ओला यांनी सोबत भेट देत महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर दर्शन घेत आरती केली. यावेळी विजय दर्डा आणि राकेश ओला यांनी भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासोबतच आयोजकांचे कौतुक केले.
मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले, रेणू मोहिले, मंडळाचे सचिव आनंद कसगीकर, कोषाध्यक्ष अमोल अनवीकर, नीरज दोन्तुलवार, समृद्धी पुनतांबेकर, प्राजक्ता, अनुराधा, अंजली, अंकिता, सुदीप्ता, संचिता, स्नेहा, तनुश्री, अर्पित, अक्षय, नितीन येटे, वर्षा येटे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................