आॅनलाईन लोकमतवर्धा : जलसंधारणाचे महत्व ओळखलेल्या या काकडधरा या आर्वी तालुक्यातील आदिवासी बहुल गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून असा समाजहितोपयोगी निर्णय घेणारे हे देशातील पहिले गाव ठरले आहे.आर्वी तालुक्यातील अतिदुर्गम भागात काकडधरा गाव आहे. पाणलोट तंत्रज्ञान समजून घेत श्रमकार्याने भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी कायम पुढाकार घेतला. येथेच ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ च्या प्रेरणेमुळे पाणलोट उपचाराची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानासोबत पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविण्यासाठी गावकऱ्यांनी विविध उपक्रम राबविले. जलसंधारणासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने काम करणारे काकडधरा हे पहिले गाव ठरले. वृक्षारोपण, गावातील पाणी भूगर्भात जिरविण्यासाठी शोषखड्डे, पाणी बचाव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन यशस्वीपणे पूर्ण केले. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पुढील पिढीपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचविण्याचा एक भाग म्हणून गावामध्ये जलदेवतेची स्थापना करण्याचा निर्र्णय घेतला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाण्याचे महत्व अधोरेखित करण्यासोबतच काकडधरा या गावाने आदर्श निर्माण केला आहे.