लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी २ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी व पूजनासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नसतो. त्यामुळे, प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत अर्थात दुपारी १.३० वाजतापर्यंत कधीही स्थापना व पूजन करता येईल.स्थापना व पूजनासाठी सकाळी ६.३० ते ८ वाजतापर्यंत उत्तम वेळ लागून आली आहे. तरी मुहूर्तानुसार स्थापना करणाऱ्यांसाठी या दिवसातील सर्वोत्तम असा मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ वाजतापर्यंतचा आहे. या वेळांमध्ये वातावरणात चंद्र व गुरू या ग्रहांचा शुभप्रभाव असल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. या दिवशी भद्रा प्रारंभ दुपारी ३.२२ वाजतापासून आहे. चंद्रास्त रात्री ९.०८ वाजता आहे. सार्वजनिक गणेशाची स्थापना सांगितलेल्या वेळेव्यतिरिक्त दुपारी १.३० ते संध्याकाळी ६.३० वाजतापर्यंत करता येईल. या दिवशी राहूकाल सकाळी ७.३० ते ९ वाजतापर्यंत असला तरी गणेश स्थापना व पूजन करता येईल, असा योग असल्याचे वैद्य यांनी सांगितले. भाद्रपद गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशस्थापना व पूजन करणे शक्य नसल्यास, त्या दिवसानंतर त्यावर्षी ते करू नये. यामुळे, एखाद्या वर्षी श्रीगणेश स्थापना झाली नाही तर अघटित घडेल, असे होत नाही. तसेच, स्थापनेनंतर अशौच आल्यास दुसºयाकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरी चालतील, असे शास्त्रच सांगत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यासोबतच, गणेश विसर्जनाबाबतीत कोणतीही अंधश्रद्धा पाळू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.