लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : नरखेड नगर परिषदेची विशेष अंदाजपत्रकीय विशेष सभा गुरुवारी (दि. १८) पालिकेच्या सभागृहात पार पडली. यात पालिकेचे लेखापाल हरिश्चंद्र ठाकरे यांनी सन २०२०-२१ चे सुधारित व सन २०२१-२२ चे ६५ काेटी ७७ लाख ४० हजार ५९१ रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यात शहरातील विविध याेजना व विकास कामांसाेबत तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
आगामी आर्थिक वर्षात नरखेड शहरामध्ये विविध कल्याणकारी याेजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न व खर्च १०० टक्के दाखवण्यात आला असून, महिला बालकल्याण विभागासाठी पाच टक्के, अपंग कल्याण याेजनेसाठी पाच टक्के, क्रीडा व युवक कल्याणसाठी १० टक्के निधीची तरतूद करण्यात आली. दलितवस्ती विकासासाठी ३.५ कोटी रुपये, रमाई आवास योजनेसाठी ५० लाख रुपये, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरात्थोन योजनेसाठी ३.४१ कोटी रुपये, दलितेतर योजनेसाठी १.४५ कोटी रुपये, १५ वा वित्त आयोगांतर्गत ८.३२ काेटी रुपयांची विविध विकास कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत.
पंतप्रधान आवास योजनेसाठी ८.११ कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेवर ५.०३ कोटी रुपये, रस्ता निधी व विशेष रस्ता निधीसाठी ३.५० कोटी रुपये, क वर्गातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५० लाख रुपये, अल्पसंख्याकांच्या विकासाकरिता ५५ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचेही या सभेत स्पष्ट करण्यात आले. या अंदाजपत्रकीय बैठकीला नगराध्यक्ष अभिजीत गुप्ता, पालिकेचे उपाध्यक्ष हरीष बालपांडे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती अनिता गजबे, नगरसेवक वंदना बेहरे, मुशीर शेख, सुरेश रेवतकर, उज्ज्वला जंगम, तृप्ती गुरमुळे, अमिता गजभिये, सुधाकर ढोके, मनीषा अरमरकर, सुरेश धुर्वे, प्रगती कडू, रंजना बालपांडे, संजय चरडे, सुनील बालपांडे यांच्यासह पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.