लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : सन २००९ला वेकोलीने आमची जमीन भूसंपादित केली. अंदाजे ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केल्यानंतर अनेकदा चर्चा, निवेदने आणि आंदोलने झालीत. प्रत्येकवेळी पोकळ आश्वासने वेकोलिने दिले. अद्याप आमच्या गंभीर प्रश्न आणि समस्यांचा गुंता सोडविण्यात आला नाही. यामुळे तातडीने संपत्तीचे मूल्यांकन करा आणि मोबदला द्या, अशी मागणी उमरेड तालुक्यातील हेवती येथील ग्रामस्थांनी केली आहे. वेकोलिने अनेकदा शब्द दिला, पण तो पाळला नाही. येत्या १ मार्च २०२१पर्यंत मोबदला मिळाला नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी पत्रपरिषदेत दिला.
मकरधोकडा कोळसा खाण क्रमांक-३ या योजनेंतर्गत उमरेड तालुक्यातील हेवती या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय वेकोलिने घेतला. जून २०१७ पर्यंत पुनर्वसन करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. वेकोलिच्या या निर्णयानंतर आणि भूमिकेनंतर हेवती गावकऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला. या संपूर्ण घडामोडीनंतर अद्यापही संपत्तीच्या मूल्यांकनाची यादी प्रकाशित करण्यात आली नाही. शिवाय, गावकऱ्यांना मोबदलासुद्धा देण्यात आला नाही. यापूर्वी १२ ते १७ डिसेंबरपर्यंत हेवती ग्रामस्थांनी कोळसा खाणीचे उत्पादन बंद करीत आंदोलन पुकारले होते. यावेळी १ फेब्रुवारीला संपत्तीच्या मूल्यांकनाची यादी प्रकाशित करणार आणि १ मार्च २०२१ पासून मोबदलासुद्धा देण्याची घोषणा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. यानंतर आंदोलनाची सांगता झाली होती. अद्यापही अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. यावरून गावकरी कमालीचे संतापले असून, दि. २ मार्चपासून कोळसा खाण बंद करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला हेवती गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा वाघ, उपसरपंच भिका भोयर, देवराव डांगाले, राजू येपारी, सुरेखा पोटे, संगीता येपारी आदींची उपस्थिती होती.
....
यादी लावली पण...
वेकोलि प्रशासनाने गुरुवारी (दि.२५) गावकऱ्यांच्या नावांचा उल्लेख असलेली यादी प्रकाशित केली. यामध्ये संपत्तीच्या मूल्यांकनाची कुठेही नोंद नसून मूल्यांकन कसे व किती रक्कम याबाबतचा घोळ अद्यापही कायम आहे. वेकोलि आमची फसवेगिरी करीत असल्याचाही आरोप यावेळी हेवती येथील गावकऱ्यांनी केला.