नागपूर : गुन्हेगारीसह अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेस्थानक व परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. परिणामी रेल्वेखाली होणाऱ्या आत्महत्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. परंतु अद्याप पूर्ण नियंत्रण मिळविता येणे शक्य झाले नाही. मागील अडीच वर्षांमध्ये नागपूर लोहमार्ग जिल्ह्यांतर्गत ६३ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्या. याच काळात रूळ ओलांडणाऱ्या शंभरावर नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.
रेल्वे परिसरातील गुन्हेगारी, तस्करी, अवैध विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेस्थानक व परिसरात गस्त वाढविली असूनही रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रकार सुरूच आहे. नागपूर लोहमार्ग जिल्ह्यातील सहा ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२१ या काळात ६३ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्या. नागपूर ठाण्याचा विचार केल्यास २०१९ या वर्षभरात ७ जणांनी आत्महत्या केल्या. २०२० मध्ये बराच काळ रेल्वे बंद होत्या. शहरातही लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. यानंतरही आत्महत्येच्या ५ घटनांची नोंद झाली. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यांमध्ये चार आत्महत्यांची नोंद झाली आहे. इतवारी ठाण्यात २०१९ मध्ये ९, २०२० मध्ये २ तर चालू वर्षात एका आत्महत्येची नोंद झाली आहे. रुळाशेजारील गावांमध्ये सतत जनजागृती केली जाते. त्यानंतरही रुळ ओलांडताना रेल्वेची धडक लागून मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. मागील अडीच वर्षांमध्ये ११३ जणांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला. सर्वाधिक २२ मृत्यू वर्धा ठाण्यांतर्गत झाले आहेत. त्यापाठोपाठ नागपूर ठाण्याचा क्रमांक लागतो.
.............
विविध कारणांनी झालेले मृत्यू
रुळ ओलांडताना - ११३
इलेक्ट्रिक शॉकमुळे - १८
आत्महत्या - ६३
अन्य कारणे -३४०
रेल्वेतूनपडून ९२ जणांचा मृत्यू
प्रवाशांना वारंवार आवाहन करूनही धावत्या रेल्वेत चढणे किंवा उतरण्याचा प्रकाराला आळा घालता येऊ शकला नाही. धावत्या रेल्वेतून पडून ९२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद नागपूर लोहमार्ग जिल्ह्यात झाली आहे. नागपूर ठाण्यात १४, इतवारीत १९ तर गोंदिया ठाण्यात दोन वर्षांमध्ये २२ जणांचा रेल्वेखाली पडून मृत्यू झाला आहे.
.............