ऐषोआरामासाठी निवडला हैवानी मार्गनागपूर : युग चांडक हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार राजेश दवारे याने युग चांडकच्या कुटुंबीयांना अटकेनंतरदेखील प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याने विविध माध्यमांतून त्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय पण साक्षीदारांनादेखील त्याने धमकी दिली होती. लहानपणापासूनच अपराधी प्रवृत्तीचा असलेल्या राजेशने अरविंदसोबत ऐशोआरामासाठी सहजपणे पैसा यावा यासाठी निष्पाप युगचा बळी घेतला.राजेश दवारे याने अटकेनंतरदेखील सहजासहजी कबुलीजवाब दिला नाही. चांडक कुटुंबीयांसोबतच त्याने स्वत:चे मित्र आणि प्रेयसीलादेखील धमकी दिली होती. जिल्हा न्यायालयात साक्ष देत असलेल्या मित्राला भर न्यायालयात त्याने ‘गद्दार’ म्हटले होते. त्याच्या या कृतीमुळे तेथे उपस्थित सर्वच लोक आश्चर्यचकित झाले होते.अटकेनंतर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता राजेश व अरविंद सिंह या दोघांनाही सदर पोलीस ठाण्याच्या कोठडीत बंद करण्यात आले होते. यावेळी राजेशची भेट एका गुन्हेगाराशी झाली. त्याने संबंधित अपराध्याला डॉ. चांडक यांच्याकडे ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’ म्हणून जाण्यास सांगितले. तेथे जाऊन चावी घेऊन चोरी करण्याचीदेखील युक्ती सुचविली होती. आपली प्रेयसीच आपल्या विरोधात साक्ष देणार असल्याची बाब कळताच तो संतप्त झाला होता. त्याच्या प्रेयसीने मोबाईल क्रमांक बदलला होता. तरीदेखील राजेशने तिचा क्रमांक मिळविला व तिला धमकी देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचाराजेश सुरुवातीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. डॉ.चांडक यांच्याकडे काम करण्याअगोदर तो शांतिनगर येथील एका संगणक संस्थेत काम करायचा. तिथे त्याने चोरी केली होती. डॉ.चांडक यांच्याकडेदेखील त्याने पैसे चोरले होते. डॉ.चांडक यांनी त्याला समजविल्यानंतर तो त्यांनाच धडा शिकविण्याचा बेत रचू लागला होता. यातून त्याने युगला काही वेळा झापडदेखील मारली होती. राजेश व अरविंद चार वर्षांपासून मित्र होते. घरची परिस्थिती खराब असतानादेखील त्याला ऐशोआरामात रहायचे होते. पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी त्याने गुन्हेगारीचा रस्ता निवडला होता.
अटकेनंतरही दिला चांडक कुटुंबीयांना त्रास
By admin | Published: May 06, 2016 2:55 AM