नागपूर : ग्रामीण महिलांमध्ये सुखरूप प्रसूतीपासून ते नवजात अर्भकाची काळजी घेण्याविषयीसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असणाऱ्या एका ‘आशा वर्कर’ने मरणानंतरही परोपकाराचा वसा सोडला नाही. त्यांच्या अवयवदानामुळे तिघांचे जीव वाचले. विशेष म्हणजे, सोमवारी मध्यरात्री नागपुरातील एका खासगी हॉस्पिटल ते सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून २६ वर्षीय तरुणाला मूत्रपिंड दान करण्यात आले.
शुभांगी मधुकर कासोद (६४) त्या अवयवदाताचे नाव. चारागाव, ता. पातूर, जि. अकोला येथील त्या रहिवासी होत्या. दाभा येथे राहणाऱ्या मुलीकडे त्या आल्या असताना १८ नोव्हेंबर रोजी अचानक त्यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना रवीनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना २१ नोव्हेंबर रोजी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना तपासून मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याचे घोषित केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे व ‘झेडटीसीसी’च्या झोन समन्वयक वीना वाटोरे यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले. त्या दु:खातही त्यांचे पती मधुकर, त्यांचा मुलगा गोबिंद, त्यांचे भाऊ उमेश यांनी पुढाकार घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दात्याला शंकरनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ‘झेडटीसीसी’च्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. सजंय कोलते यांच्या मार्गदर्शनात गरजू रुग्णांना मूत्रपिंड व यकृताचे दान केले.
-तिघांना मिळाले नवे आयुष्य
शंकरनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री अवयव काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या हॉस्पिटलमधील ५१ वर्षीय पुरुषाला एक मूत्रपिंड तर याच हॉस्पिटलमधील ४९ वर्षीय पुरुषाला यकृत दान करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील २६ वर्षीय तरुणाला देण्यात आले. या तिघांना नवे आयुष्य मिळाले.
- या डॉक्टरांच्या पथकाने केले अवयवाचे प्रत्यारोपण
शंकरनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. राहुल झामड, डॉ. विनोद काशेटवार, डॉ. सूर्यश्री पांडे, डॉ. स्वानंद मेळग आणि डॉ. अवंतिका जयस्वाल यांनी किडनी प्रत्यारोपण केले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात डॉ. संजय कोलते यांच्यासह डॉ. शिवचरण बालगे, डॉ. अक्षय कृपलानी, डॉ. ऋतुराज पेडणेकर, डॉ. मनीष बलवानी, डॉ. अमित पसारी, डॉ. कपिल सेजपाल, डॉ. शिवम दुबे, डॉ. प्रांजल काशीब, डॉ. विवेक चकोले यांनी प्रत्यारोपण केले.