लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) २५० खाटांच्या इमारतीला रुग्णसेवेत रुजू होऊन वर्षे झालीत, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने या वाढीव खाटांना अद्यापही मंजुरीच दिली नाही. परिणामी परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वाढीव पदे अडचणीत आली आहेत. अल्प कर्मचाऱ्यांवर रुग्णांचा भार वाढल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे.भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) मानकानुसार एकाच इमारतीत सर्व वॉर्ड व विभाग असणे आवश्यक आहे. परंतु मेयो रुग्णालयातील बहुसंख्य वॉर्ड विविध इमारतीत विखुरलेले होते. याला घेऊन ‘एमसीआय’ दरवर्षी त्रुटी काढून कोंडी करीत होती. मेयो रुग्णालयाच्या विकासाला घेऊन २०१० मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. यात २५० खाटांच्या इमारतीच्या विकासाचाही समावेश होता. परंतु अनेक घडामोडीनंतर ही इमारत एप्रिल २०१७ मध्ये रुग्णसेवेत रुजू झाली. मेयोच्या जुन्या ५९० खाटांमध्ये २५० खाटांची भर पडली. अस्थिरोग, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया कक्षासोबतच वॉर्डही उपलब्ध करून देण्यात आले. वाढीव खाटांमुळे जमिनीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना खाट मिळाली. मात्र, जुन्या खाटांच्या तुलनेत मंजूर पदांमधील परिचारिकांची ७३ पदे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २०० पदे, फार्मासिस्टची ६ पदे , तंत्रज्ञाची ५ पदे याशिवाय इतरही पदे रिक्त आहेत. या जागा न भरताच नव्याने २५० नव्या खाटांची भर पडल्याने सर्वांवरच कामाचा ताण पडला आहे. याची माहिती मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) देऊन नव्या खाटांना मंजुरी देऊन त्या दृष्टीने वाढीव पदांची मागणी केली. परंतु ‘डीएमईआर’ या गोष्टींपासून अनभिज्ञच असल्याचे दाखवित आहे. कामाच्या ताणामुळे काही कर्मचारी सुटींवर गेले आहेत तर जे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये कामाला घेऊन रोज भांडणे होत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यात गरीब रुग्ण अडचणीत सापडला आहे.८३३ खाटा परिचारिका केवळ ४७५मेयो रुग्णालयामध्ये जुन्या व नवीन खाटा मिळून ८३३ खाटा आहेत. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची संख्या केवळ ४७५ आहे. यातील साधारण ३० टक्के परिचारिका सुटीवर असल्याने एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे. वाजवीपेक्षा कामाचा ताण वाढल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हीच स्थिती कर्मचाऱ्यांची आहे.
नागपूर मेयो इस्पितळ वर्ष होऊनही २५० खाटा मंजुरीअभावीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 8:15 PM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) २५० खाटांच्या इमारतीला रुग्णसेवेत रुजू होऊन वर्षे झालीत, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने या वाढीव खाटांना अद्यापही मंजुरीच दिली नाही. परिणामी परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वाढीव पदे अडचणीत आली आहेत. अल्प कर्मचाऱ्यांवर रुग्णांचा भार वाढल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे.
ठळक मुद्दे परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ कर्मचाऱ्यांची वाढीव पदे अडचणीत