नागपूर : पावसाळ्याचे दोन महिने संपले असतानाही नागपुरात पालेभाज्यांचे दर वाढलेले असून दोन महिन्याच्या तुलनेत दुपटीवर गेले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोसळल्याने स्वस्त भाज्यांकडे ओढा वाढला आहे. याशिवाय गृहिणींनी स्वयंपाकघरात कडधान्याचा वापर वाढविला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच भाज्याच्या जास्त दरांमुळे महागाईत भर पडली आहे.
५०० रुपयांच्या भाज्या एकाच थैलीत!
सध्या विक्रीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाज्यांचे भाव वाढले आहेत. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात भाज्यांची आवक वाढत असल्याचा विक्रेत्यांचा अनुभव आहे, पण यंदा विदर्भात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पेरणी आटोपल्याशिवाय भाज्यांची लागवड करता येणार नाही. वर्षभर भाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडूनच आवक आहे. त्यामुळे नागपूरकरांना अन्य जिल्ह्यातून वा राज्यातून येणाऱ्या भाज्यांवर अवलंबून राहावे लागते. पूर्वीच्या तुलनेत आता भाज्यांच्या बाजारात ५०० रुपयांच्या भाज्या एकाच थैलीत येत आहेत. यावरून महागाईचा अंदाज येऊ शकतो, असे ग्राहकांचे मत आहे. अनलॉकमध्ये दुकाने ८ पर्यंत सुरू झाली आहेत, शिवाय विविध समारंभामुळे कॅटरर्सला कामे मिळू लागली आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळमध्ये भाज्यांचे दर दुप्पट, तिप्पटवर गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे भाज्या खरेदीचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे भाज्यांचे नवीन पीक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत गृहिणींना जास्त दरातच भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे महात्मा फुले फ्रूट, सब्जी आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.
सिमला मिरचीची बुलडाणा येथून आवक
नागपुरात भाज्यांची आवक स्थानिक शेतकरी आणि अन्य जिल्हे व राज्यातून होत आहे. पंढरपूर व संगमनेर येथून कोथिंबीर, आंध्रप्रदेश (मदनपल्ली) आणि यवतमाळ येथून हिरवी मिरची, नाशिक व औरंगाबाद येथून फूल कोबी, रायपूर व दुर्ग येथून तोंडले व ढेमस, बुलढाणा येथून सिमला मिरची, कानपूर व अलाहाबाद येथून बटाटे, अकोला, अमरावती व नाशिक येथून कांदे, बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक आहे. पालक नागपूर ग्रामीण भागातून विक्रीस येते. भाज्यांच्या दरवाढीला डिझेलचे वाढलेले दर कारणीभूत असल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले. सणांचे दिवस आणि ग्राहकांची मागणी पाहूनच अन्य जिल्हे व राज्यातून भाज्या विक्रीसाठी मागवित असल्याचे ठोक विक्रेते म्हणाले.
पालेभाज्यांचे भाव (प्रति किलो रुपये)
भाजी पावसाळ्याआधी सध्या
वांगे २० ४०
टोमॅटो २० ३०
हिरवी मिरची ३० ५०
कोथिंबीर ४० ६०
पालक २० ३०
मेथी ४० ८०
फूलकोबी ३० ४०
पत्ताकोबी २० ३०
चवळी २० ३०
कारले ३० ४०
गवार शेंग ३० ४०
ढेमस ३० ५०
तोंडले ३० ४०
सिमला मिरची ३० ४०
गाजर २० ३०
कारले ३० ४०
कमी आवकीमुळे भाव वाढले
ऑगस्ट महिन्यात भाज्यांची मुबलक आवक होते. पण यंदा कमी पावसामुळे भाज्यांची लागवड लांबल्याने आवक कमी आहे. नागपूरकरांना अन्य जिल्हे आणि राज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. नवीन लागवडीच्या भाज्या बाजारात येण्यास आणखी २० दिवस लागणार आहे. मागणीनुसार ऑर्डर देऊन भाज्या विक्रीसाठी मागवाव्या लागतात.
राम महाजन, घाऊक विक्रेते.
स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक थांबली
सध्या शेतकरी खरिपाच्या पेरणीत व्यस्त असल्याने आणि कमी पावसामुळे फार कमी शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे अन्य राज्यातून होणाऱ्या आवकीवर अवलंबून राहावे लागत आहे. बेंगळुरू टोमॅटोची आवक चांगली असल्याने भाव कमी आहेत. याशिवाय वांगे, फूलकोबी, पत्ताकोबीची आवक अन्य जिल्ह्यातून होत आहे.
नंदकिशोर गौर, घाऊक विक्रेते.
किरकोळमध्ये भाज्या दुप्पटच
लोकांची भाज्यांची ९० टक्के खरेदी किरकोळ विक्रेत्यांकडूनच होते. घाऊक बाजारात भाज्यांचे भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये दुप्पट भावात खरेदी कराव्या लागतात. गेल्या काही वर्षांपासून हाच अनुभव येत आहे. महामारीमुळे उत्पन्न कमी झाले असून किराणा व भाज्यांच्या खरेदीसाठी जास्त पैसे लागतात.
शालिनी कट्यारमल, गृहिणी.
महिन्याच्या बजेटवर ताण
पेट्रोल, किराणा आणि भाज्यांच्या वाढत्या किमतीचा महिन्याच्या बजेटवर ताण आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे बजेट दुपटीवर गेले आहे. याशिवाय मुलांचा शैक्षणिक शुल्क वाढल्याने महिन्याचा खर्च करताना बरीच कसरत करावी लागते. किमान भाज्या तरी बजेटमध्ये मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.
आयुषी वैरागडे, गृहिणी.