दयानंद पाईकराव/आनंद शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून मुजफ्फरनगरला अडकून पडलेले ११ प्रवासी बुधवारी नवी दिल्ली-बिलासपूर एक्स्प्रेसने नागपुरात पोहोचले. येथून त्यांना यवतमाळला जायचे होते. मात्र त्यांना घेण्यासाठी वाहनच आले नसल्यामुळे त्यांना तासन्तास रेल्वेस्थानकासमोर बसून राहावे लागले.यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील काही नागरिक धार्मिक कार्यक्रमासाठी मुजफ्फरनगरला गेले होते. दीड महिना ते लॉकडाऊनमध्ये अडकले होते. त्यानंतर त्यांना केंद्र शासनातर्फे नवी दिल्ली-बिलासपूर स्पेशल रेल्वेगाडी चालविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. लगेच त्यांनी या गाडीचे आरक्षण केले. यात सहभागी नागरिक जफर खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, त्यांच्यासोबत ६ महिला आणि ४ पुरुष आहेत. मुजफ्फरनगरला या सर्वांची कोरोना तपासणी करण्यात आली. १८ एप्रिलला त्याचा अहवाल येणार होता. परंतु हा अहवाल २२ एप्रिलला मिळाला. नागपूरपर्यंत गाडीचे आरक्षण केल्यानंतर ही गाडी पकडण्यासाठी ते दिल्लीला पोहोचले. गाडीत बसून बुधवारी सकाळीच ते नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. नागपुरातून यवतमाळला जाण्यासाठी कोणतेच साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांना या बाबत माहिती दिली. त्यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन त्यांच्यासाठी वाहन पाठविले. परंतु वाहन येण्यासाठी खूप उशीर झाल्यामुळे सकाळी ६ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते रेल्वेस्थानकासमोरील दुकानासमोर बसून होते. रोजासाठी त्यांच्याकडे भोजनही नसल्यामुळे ते रोजा ठेवू शकले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.