योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकारी करत कर्ज देणाऱ्या एका आरोपीने पूर्ण पैसे मिळाल्यावरदेखील तिप्पट पैशांचा तगादा मागे लावला व वैद्यकीय तज्ज्ञाला २.४० कोटींची खंडणी मागितली. आरोपीने तक्रारदाराला जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली.अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
नरेन्द्र वासुदेवराव घिके (६४, शिवाजीनगर) यांचे धरमपेठ येथे ईमेजिंग पॉईंट नावाचे एक्सरे व सोनोग्राफी क्लिनिक आहे. त्याच्या क्लिनिकमधील मशीन्स खराब झाल्याने त्यांना नवीन खरेदी करायची होती. त्यासाठी कर्ज मिळावे म्हणून त्यांनी बॅंकेत अर्ज केला होता. मात्र कर्ज मंजूर होण्यास वेळ लागणार असल्याने त्यांनी मनोज वसंत हिवरकर (३८, झिंगाबाई टाकळी) याला पैसे मागितले. मनोजने १० टक्के दरमहा व्याजाने ३० लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. दर महिन्याला वेळेवर व्याज द्यावे लागेल असे त्याने सांगितले होते. त्याने धिके यांच्याकडून ३ कोरे धनादेश व कोऱ्या स्टॅंपपेपरवर त्यांची सही घेतली होती.
१ सप्टेंबर २०२१ पासून घिके यांनी मनोजला ७७.७० लाख रुपये परत केले. १० मे रोजी सकाळी मनोज त्यांच्याकडे गेला व हिशेबाचा कागद दाखविला. मुद्दल व व्याज मिळून २.४० कोटी रुपये झाले असा दावा करू लागला. त्याच्यासोबत आणखी दोन इसम होते. घिके यांनी ठरल्याप्रमाणे पैसे व दर महिन्याला व्याज दिल्याचे सांगितले. मात्र मनोजने २.४० कोटी द्यावेच लागतील असे म्हणून घिके व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने हादरलेल्या घिके यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मनोजविरोधात भादंविच्या कलम ३८४, ३९५, ३८६, ३८७ व ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.