नागपूर : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजपच्या महिला पदाधिकारी सना यांचा अद्याप शोध लागलेला नाही. जबलपूरचा गुन्हेगार अमित उर्फ पप्पू साहू याने महिनाभराअगोदर त्यांना खुनाची धमकी दिली होती. त्याचा पोलिस शोध घेत असून अद्याप त्याचा सुगावा लागलेला नाही.
४० वर्षीय महिला पदाधिकारी १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. २ ऑगस्टला सकाळी तिने आईला फोन करून जबलपूरला पोहोचल्याचे सांगितले. तेव्हापासून त्या बेपत्ताच आहेत. अमित साहू हा जबलपूरचा व्यावसायिक गुन्हेगार आहे. तो हॉटेल-ढाबा चालवतो. २ ऑगस्टला संध्याकाळी महिला नेत्याला तिच्या आईचा फोन आला. तिने फोन न उचलल्याने त्यांनी अमित साहूला संपर्क केला. मात्र त्याच्या बोलण्यातून संशय आल्याने त्यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मानकापूर पोलिसांनी तत्काळ जबलपूरला एक पथक पाठवून मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने महिला पदाधिकाऱ्यासह अमित साहू आणि त्याचा भाऊ मनीष यांचा शोध घेतला. तिघांचाही काहीच सुगावा लागलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पदाधिकाऱ्याचे अमित साहू याने अपहरण केले आहे. यामध्ये अमितच्या भावाचाही हात असल्याचा संशय आहे. साहू आणि महिला पदाधिकाऱ्यामध्ये झालेल्या भांडणाचे कारणही पोलिसांना शोधता आले नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली. प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.