सुमेध वाघमारे/ नागपूर : मकरसंक्रांतीच्या नावाखाली सोमवारी दिवसभर पतंगबाजीचा उन्माद दिसून आला. नायलॉन मांजामुळे दोन दुचाकीस्वाराचा गळा कापला. यातील एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उत्तर नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर किरकोळ घटनांमध्ये ४०वर जखमी झाले. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती.
आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसºयाचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालीत होते. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असतानाही त्याची अंमलबजावणी होताना आज दिसून आलेली नाही.
- नायलॉन मांजाने गळा कापल्याने लागले टाके कपीलनगर ठाण्यांतर्गत जरीपटका रिंग रोडवरून ५४ वर्षीय दुचाकीस्वार जात असताना अचानक नायलॉन मांजा समोर आला. काही कळण्याच्या आतच त्यांचा गळा कापला गेला. तिथे उपस्थित दोघांनी त्यांना कमाल चौक येथील मदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखम खोल असल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलचे म्हणणे आहे. अशीच एक घटना भानखेडा येथील २८वर्षीय युवकासोबत घडली. नायलॉन मांजामुळे या युवकाचा गळा कापल्या गेल्याने मदन हॉस्पिटलमध्ये १० टाके लागले. या दोन्ही घटनेची माहिती कपीलनगर पोलीसांना मिळाल्यावर त्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केल्याची माहिती आहे.
-मेयोमध्ये १२ जखमींवर उपचारइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) सोमवारी पतंगाच्या माजांमुळे जखमी झालेल्या १२ जखमींवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले, हे सर्व रुग्ण किरकोळ जखमी होते. यामुळे कॅज्युल्टीमध्येच उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.
- पतंगाचा नादात ३२ वर्षीय तरुण वरून खाली पडलापतंगाचा नादात एक ३२वर्षीय तरुण पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्याचा डाव्या हाताला गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या कॅज्युल्टीमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. या शिवाय, मांजामुळे ८ वर्षीय मुलाचा पाय कापला, १४ वर्षीय मुलाचा पाय कापल्याने टाके लावावे लागले, या शिवाय इतरही किरकोळ रुग्ण उपचारासाठी आले होते, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. या शिवाय, रवीनगर, मानेवाडा, प्रतापनगर चौक, सदर, काटोल रोड, कोराडी रोड, कामठी रोड व उमरेड रोड मार्गावरील अनेक मोठ्या खासगी इस्पितळांत तीसच्यावर जखमींनी उपचार घेतल्याची माहिती आहे.
- मांजा तुटतच नव्हताजखमी झालेल्या काहींनी ‘लोकमत’ला सांगितले, अचानक समोर आलेल्या मांजाला हात लावला आणि हाताची बोटे कापल्या गेली. हा मांजा तुटतच नव्हता. नायलॉन मांजावर बंदी असताना हा मांजा आला कुठून हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जिल्हाधिकारी व पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाºया व वापरणाºयांवर कारवाईचा इशारा दिला. काहींवर कारवाईही झाली. परंतु सोमवारी अनेक पतंगशौकीन नायलॉन मांजाचा सर्रास वापर करीत असल्याचे दिसून आले.