नागपूर : मे महिन्यात जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया पार पडली. सर्व विभागांतील १५८ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांना ३० जून पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे होते. मात्र, विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी विभागप्रमुखांना तंबी दिल्यानंतरही मर्जीतील कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखांनी रिलिव्ह केलेले नाही.
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ रिलिव्ह करा, अन्यथ नवीन बदली होवून आलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेता येणार नाही. असे शर्मा यांनी निर्देश दिले. जि.प. मुख्यालयात बदली करण्यात आलेले कर्मचारी येथे येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. काहींनी प्रतिनियुक्तीने सोयीच्या जागेसाठी प्रयत्न चालविले आहे. शासनाने ३० जून पर्यत बदल्यांना मुदतवाढ दिली होती. बदल्यांची प्रक्रीया पारदर्शक पार पडली असताना अनेक कर्मचारी आपला मूळ विभाग सोडण्यात तयार नसल्याचे दिसते.
सीईओंच्या भूमिकेकडे लक्ष
प्रशासकीय बदलीनंतरही विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणे हा शिस्तभंगाचा प्रकार आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात वारंवार सूचना, निर्देश देण्यात आले. त्यानंतरही संबंधितांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. बदलीनंतरही संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्याच विभागातून काढले जात असल्याने सीईओ सौम्या शर्मा काय भूमिका घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.