जलालखेडा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बस सेवा बंद करण्यात आली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या सेवा पुन्हा बंद करण्यात आल्या. अॅनलॉकनंतर ७ जूनपासून बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील काटोल आगाराने अजूनही जलालखेडा ते नरखेड व काटोल ते अंबाडा बस सेवा सुरू केलेली नाही. अनलॉकला आठवडा उलटूनही बस सेवा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे कृषी विषयक कार्यालयीन कामाकरिता शेतकऱ्यांना नरखेड येथील कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जावे लागते. परंतु या मार्गावरील बस सेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जलालखेडा परिसरात जवळपास २० ते ३० गावे आहेत. पण सध्या सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने येथील नागरिकांना तालुक्याची स्थळी जाण्यासाठी खाजगी वाहनांना जास्त पैसे द्यावे लागतात. अंबाडा हे गाव नरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे त्या बाजूने खासगी वाहनेसुद्धा जात नाही. त्या भागातील नागरिकांना खरेदीसाठी किंवा कामानिमित्त जलालखेडा, काटोल, नरखेड जाण्याकरिता एसटी शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहे.
---
जलालखेडा ते नरखेड व काटोल ते अंबाडा या दोन्ही मार्गावरील बस सेवा एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल.
- कुलदीप रंगारी, व्यवस्थापक, काटोल आगार
----
जलालखेडा ते नरखेड बस सेवा बंद असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतीच्या कामासाठी नरखेड येथील कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात जावे लागते. परंतु या मार्गावरील बस बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण जात आहे. त्यामुळे या मार्गावरील बस सेवा लवकर सुरू करण्यात यावी.
- हेमंत ठोंबरे, शेतकरी, मुक्तापूर.