प्रदर्शनापूर्वीच ‘नाय वरनभात लोन्चा’चा झाला लोचा; बीभत्स दृष्यांमुळे बंदीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 07:20 PM2022-01-18T19:20:46+5:302022-01-18T19:27:03+5:30
Nagpur News प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आला. मात्र प्रदर्शनापूर्वीच तो कायद्याच्या लोच्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आला. मात्र प्रदर्शनापूर्वीच तो कायद्याच्या लोच्यात अडकण्याची चिन्हे आहेत. या चित्रपटाविरूद्ध भारतीय स्त्री शक्ती संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यात अल्पवयीन मुले व महिलांचा अतिशय बीभत्सपणे वापर करण्यात आला आहे, तसेच विकृती व हिंसाचार वाढविणारी आणि अश्लीलतेचा कळस गाठणारी दृश्ये चित्रपटात आहेत. त्यामुळे चित्रपटावर बंदी आणण्याची विनंती संघटनेने न्यायालयाला केली आहे.
हा चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. तत्पूर्वी १० जानेवारी रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर वादाची ठिणगी पडली. आक्षेपार्ह दृश्ये पाहून सर्वत्र चित्रपटावर टीका सुरू झाली. परिणामी, चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही. भारतीय स्त्री शक्ती संघटनेने चित्रपटाविरुद्ध अतिशय गंभीर भूमिका घेतली आहे. चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांमुळे भादंविच्या कलम २९२, पॉक्सो कायद्यातील कलम १३ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ याअंतर्गतचे गुन्हे लागू होतात, असे संघटनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय महिला आयोग, महिला व बाल विकास मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन व राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी या तक्रारीची दखल घेऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय सचिवांना चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची मागणी केली आहे.
सुनावणी तहकूब
या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने काही तांत्रिक कारणांमुळे याचिकेवरील सुनावणी एक आठवडा पुढे ढकलली.