नागपूर : गत आठवड्यात ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्यात सावनेर, भिवापूर, उमरेड, कुही, नरखेड आणि काटोल तालुक्यातील शेती अक्षरशः खरडून नेली. नदी-नाल्यांचे पाणी शिवारात शिरले.
महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २९ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा उत्पादन चांगले होईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र पुरात स्वप्न वाहून गेले आहे. आता सरकार मदत करेल, या आशेवर तो जीवन जगतो आहे.
२६ जणांचा गेला जीव
नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार १ जूनपासून २२ जुलैपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २६ जणांचा जीव गेला आहे. २२ जण जखमी झाले. १९५ पशुहानी झाली. ५३३ पक्ष्यांचाही मृत्यू झाला. तर १५१९ घरे, गोठे, व झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तलावाचा बांध फुटल्याने नागपूर ग्रामीण तालुक्यातील जुनापाणी गाव बुडाले.
सावनेर, उमरेड, भिवापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मुसळधार पावसामुळे सावनेर, उमरेड आणि भिवापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सावनेर तालुक्यात ५ हजारांहून अधिक हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. ५० हून अधिक गावांत पुराचे पाणी शिरले. भिवापूर तालुक्यात ५,३३४ शेतकऱ्यांचे ५,५०७ हेक्टरवर शेतातील पिकांचे नुकसान झाले. उमरेड तालुक्यात ७,५५२.२७ हेक्टर क्षेत्रातील पिकास फटका बसला.
शेती बुडाली, मुलांना कसं शिकवू ?
काटोल तालुक्यातील चिखली नजीकच्या गोन्ही शिवारात बाबाराव काळे यांच्या ४ एकर शेती आहे. दीड एकरात सोयाबीन आणि तूर लावली होती. तर उर्वरित जागेवर पऱ्हाट होती. बियाणे अंकुरताना मुसळधार पावसाने घात केला. अख्खे शिवार पाण्याखाली आले. आता पिके सडू लागली आहे. शेतीसाठी एक लाखाचे कर्ज झाले. नववी आणि बारावीत असलेल्या मुलांचे शिक्षण करायचे आहे. साहेब यंदा सारेच बुडाले, मुले कसे शिकवू, काय खाऊ? असा पाणावलेल्या डोळ्यांनी प्रश्न त्यांना विचारला.
शेतात तळे, पिके पवळी !
सावनेर तालुक्यात शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी आहे. दोन दिवस उघड मिळाली. मात्र, आता पुन्हा ढग दाटून आले. अतिपावसाने खुबाळा, रिचा, सावनेर, कुसुंबी, नांदोरी, बडेगाव, खापा, उमरी जांभळापाणी, सिल्लोरी, बिचवा, कोच्छी, भेंडाळा, वाकोडी, गडेगाव, आंगेवाडा, तिघही, टेंभुरडोह शिवारातील पिके पिवळी पडू लागली आहेत.
रात्र जागून काढली...
गत रविवारी भिवापूर तालुक्यातील १० वर गावांत पुराचे पाणी शिरले. मध्यरात्रीच्या सुमारास नांद, चिखलापार, वणी, खरकाळा, धामनगाव (वि.म.), वडध, चिखली, जवळी, रोहणा आदी दहा गावांतील असंख्य घरांत पुराचे पाणी शिरल्यामुळे येथील ग्रामस्थांना अख्खी रात्र जागून काढावी लागली.