नुसती छातीला बंदूक लावली तरी होतो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 08:45 PM2022-01-12T20:45:01+5:302022-01-12T20:45:48+5:30

Nagpur News नुसती दुसऱ्याच्या छातीला बंदूक लावली तरी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा लागू होतो. त्याकरिता संबंधित व्यक्ती जखमी होण्याची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

Even a gunshot touch to the chest is a crime; High Court | नुसती छातीला बंदूक लावली तरी होतो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

नुसती छातीला बंदूक लावली तरी होतो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

Next
ठळक मुद्देव्यक्ती जखमी होणे आवश्यक नाही

नागपूर : नुसती दुसऱ्याच्या छातीला बंदूक लावली तरी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा लागू होतो. त्याकरिता संबंधित व्यक्ती जखमी होण्याची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

हे प्रकरण अमरावती येथील आहे. ३० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपी निखिल प्रकाश घुरडे (३०), अमोल अशोक मेश्राम (३०) व अन्य एक जण सोनल कॉलनीतील रोडवर पेलेट बंदूक घेऊन उभे होते. दरम्यान, त्यापैकी एकाने रोडच्या बाजूला शांतपणे बसलेल्या कुत्र्यांवर गोळी झाडली. त्यामुळे कुत्रा जाग्यावरच ठार झाला. त्यावेळी तेथून जात असलेले फिर्यादी यश पाटके (२१) यांनी आरोपींना हटकून जाब विचारला. परिणामी, आरोपींनी चिडून पाटके यांच्या छातीला बंदूक लावून गोळी झाडण्याची धमकी दिली. त्यामुळे पाटके घाबरून पळून गेले.

त्यानंतर त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३३६, ४२९ यासह शस्त्र कायदा व प्राण्यांवरील क्रूरता कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी घुरडे व मेश्राम यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बंदुकीची गोळी झाडली नाही. फिर्यादी जखमी झाला नाही. करिता, गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने वरील कायदेशीर बाब स्पष्ट करून आराेपींचा अर्ज फेटाळून लावला.

आरोपींना दाखवायचे होते वर्चस्व

संबंधित कुत्रा समाजाकरिता धोकादायक होता. त्यामुळे त्याला गोळी झाडून ठार मारण्यात आले, असे हे प्रकरण नाही. आरोपींनी शांतपणे बसलेल्या कुत्र्याला ठार मारले. त्यावरून त्यांचा समाजाला स्वत:चे वर्चस्व दाखविण्याचा उद्देश होता, हे दिसून येते. याशिवाय त्यांनी फिर्यादीच्या छातीला बंदूक लावून गोळी झाडण्याची धमकी दिली. सुदैवाने गोळी झाडली गेली नाही, असे न्यायालयाने आरोपींचा बचाव अमान्य करताना नमूद केले.

पूर्ण खटला चालविणे आवश्यक

सध्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला नाही. तपास अधिकाऱ्याला तपास पूर्ण करण्याची संधी देणे गरजेचे आहे. त्यानंतर सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करून आरोपींविरुद्ध पूर्ण खटला चालविणे आवश्यक आहे. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. परिणामी, हा गुन्हा प्राथमिक टप्प्यावर किंवा आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रद्द केला जाऊ शकत नाही, याकडेही हा निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले.

Web Title: Even a gunshot touch to the chest is a crime; High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.