नागपूर : कोरोनाच्या संक्रमणाने अंतर एवढे वाढविले की माणुसकीही आता आटली की काय असे वाटायला लागले आहे. एकीकडे काही माणसे संक्रमितांची सेवा करीत असताना रक्ताच्या नात्यातील माणसे मात्र पाठ फिरवित आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना शहरातील रेशीमबागमध्ये उजेडात आली. ९६ वर्षीय वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांनी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला, एवढेच नाही तर आईच्या अस्थी घ्यायलाही कुणी आले नाही.
या परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. या माहितीनुसार, ही वृद्धा आपल्या मुलीसोबत रेशीमबागमध्ये राहायची. दोघेही कोरोना संक्रमित झाले. अशा परिस्थितीत मुलगी आईला घरात घरात एकटे ठेऊन दुसरीकडे राहायला गेली. एकटे राहणाऱ्या या वृद्धेचा कधीतरी मृत्यू झाला. दुर्गंधी सुटली. शेजाऱ्यांनी तपास घेतला असता हा प्रकार लक्षात आला. नागिरकांनी ही माहिती नागपुरातच राहणाऱ्या मुलाला दिली. मात्र आपण येऊ शकत नाही, परस्पर अंत्यविधी उरकून घ्यावा, असे या मुलाने स्पष्ट सांगितले. नागरिकांनी मुंबईत राहणाऱ्या दुसऱ्या मुलालाही हे कळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संपर्कच झाला नाही. अखेर नागरिकांनी मनपाला कळविले. काल रात्री मनपाच्या कर्मचाऱ्यांनी प्रेत नेऊन अंत्यसंस्कार केले.
बुधवारी कर्मचाऱ्यांनी मुलाला फोन करून अस्थी घेऊन जाण्यास कळविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. ही घटना एका उच्च कुटुंबाशी संबंधित आहे. दोन्ही मुले मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाली आहेत. मात्र कोरोनाने त्यांच्या संवेदना बधीर केल्या, असेच म्हणावे लागेल ! आपल्या जन्मदात्या आईच्या अखेरच्या क्रियाकर्मातही त्यांना हजर राहण्याची जाणीव झाली नाही, असेच यावरून दिसते. ही घटना मानवीयदृष्ट्या संवेदनशील आहे. म्हणूनच कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये, यासाठी ‘लोकमत’ने नाव प्रकाशित न करता संबंधितांची ओळख लपविली आहे.