नागपूर :मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढा. ओबीसींचे आरक्षण वाढवून द्या. आंदोलनस्थळी जाऊन मी हेच बोललो. ओबीसी समाजाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका आहे. जीव गेला तरी चालेल, पण ओबीसी कार्यकर्ता म्हणून मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भुजबळ साहेब म्हणले ओबीसीचे आरक्षण वाढवून देत असल्यास अडचण नाही म्हणून समर्थन दिले. त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. सरकार कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊ म्हणतात. पण ३० महिने घेतले तरी हे होऊ शकणार नाही. पांघरून घालण्याचे काम सरकार करत आहे. अशी बनवा बनवी करू नका, अशी टीका त्यांनी केली. सरकार वेगळी भूमिका घेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वेगळे बोलतात. दोन समाजात भांडणं लावायची भूमिका बावनकुळे यांची असले तर मराठा समाज ठरवेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
गृहमंत्र्यांनी माफी मागितली पण उशीर केला
- गहमंत्री फडणवीस यांनी माफी मागून चूक मान्य केली, यात मोठेपण दाखवला चांगला आहे. पण उशीर झाला. या माफीसाठी मराठा समाजाला आनंद आहे का ते ठरवतील, असेही वडेट्टीवार म्हणाले. चुकीचे गुन्हे मागे घेऊ असा शब्दाचा खेळ केला जात आहे. सरकारने सरसकट गुन्हे मागे घ्यावे. या सगळ्यांची नार्को टेस्ट करा,पोलीस अधिक्षकांना आदेश कुणी दिला. दोषीला रजा आणि पोलीस उप अधिक्षक निलंबित कसे ? दूध का दूध पाणी का पाणी हे नार्कोतून स्पष्ट होईल, अशी मागणीही त्यांनी केली